योग्य दिशेने जाणारा मात्र संभ्रमात टाकणारा अर्थसंकल्प - अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 12:29 PM2018-02-07T12:29:38+5:302018-02-07T12:36:15+5:30
जळगावात पीपल्स बँक व सॅटर्डे क्लबतर्फे ‘अर्थसंकल्प २०१८-अर्थ आणि अन्वयार्थ’वर व्याख्यान
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि. ७ - यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे योग्य दिशेने जाणारा, मध्येच अनेक ठिकणारा थांबणारा आणि संभ्रमात टाकणारा असा अर्थसंकल्प असल्याचे विश्लेषण अर्थतज्ज्ञ व प्रसिद्ध वक्ते चंद्रशेखर टिळक यांनी केले.
जळगाव पीपल्स मल्टीस्टेट शेड्यूल बँक व सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट जळगाव शाखा यांच्या संयुक्तविद्यमाने मंगळवारी संध्याकाळी गंधे सभागृहात ‘अर्थसंकल्प २०१८-अर्थ आणि अन्वयार्थ’ या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर पीपल्स बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, सॅटर्डे क्लबचे अध्यक्ष श्रीधर इनामदार, सचिव विनित जोशी, अभिजित पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक श्रीधर पाटील यांनी केले.
मोदी सरकारची अर्थकारणाची परंपरा वेगळी
मोदी सरकारचा हा चौथा अर्थसंकल्पदेखील अर्थसंकल्पाबाहेर घोषणा करायच्या आणि अर्थसंकल्प केवळ नियमित पद्धतीने सादर करायचा अशा पारंपारिक शैलीतीलच असल्याचे सांगून आयुष्यमान, आॅपरेशन ग्रीन यासारख्या योजनांसाठी पुरेशा तरतुदी आहेत का? अशी शंका व्यक्त करून त्यातील अप्रत्यक्ष मार्गही सांगितले. नोटाबंदी, जीएसटी, रेरा यासारख्या गोष्टींचाही या अर्थसंकल्पावर परिणाम जाणवतो. तसाच तो शेअर बाजारावरही जाणवला. अपेक्षा वाढवून ठेवल्यामुळेही पदरी काही वेळेस निराशा येते. ती या अर्थसंकल्पनामुळेही झाली, असे ते म्हणाले.
अर्थकारणाच्या चाब्या नव्या पिढीकडे
तरुणाई अर्थात वयाच्या ३५ वर्षाखालील युवकांची जीवन शैली, उत्पन्न शैली, गुंतवणूक शैलीदेखील सरकारने या अर्थसंकल्पात प्रामुख्याने विचारात घेतली आहे. कारण या वयोगटाच्या ‘सर्व्हिस इंडस्ट्री’मधून जीडीपीमध्ये ५४ टक्के वाटा येत आहे. त्यामुळे आता चाब्या नव्या पिढीकडे गेल्या आहेत. कृषी, उद्योग, सेवा ही वेगवेगळी क्षेत्र आहे. दीर्घकालीन गुंतवणूक करणाºयांना ‘लॉग टर्म्स कॅपीटल गेन टॅक्स’ भरावा लागेल का? आणि त्यातून किती उत्पन्न मिळेल या विषयीही त्यांनी माहिती दिली. हा अर्थसंकल्प शब्दात नाही तर सूचक पद्धतीने अनेक गोष्टी सांगणारा आहे. अर्थसंकल्प म्हणजे आर्थिक राजकारण किंवा राजकीय अर्थकारण असेही म्हणू शकतात, असे त्यांनी सांगितले.
कृषी क्षेत्राची गणिते वेगळी
कृषी क्षेत्रातील गणिते वेगळी असून त्या विषयी माहिती देताना या क्षेत्राचे धोरण केंद्र सरकार ठरवते तर अंमलबजावणी राज्य सरकार करते. असे सांगून शेवटी राजकारण विरहीत भूमिका घेतली तर या अर्थसंकल्पावर कोणतीही टिका करता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर श्रोत्यांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.
क्लटर इकॉनॉमीकडून क्लस्टर इकॉनॉमीकडे
क्लटर ‘इकोनॉमी कडून क्लस्टर इकोनॉमी’कडे घेवून जाणार हा अर्थसंकल्प असल्यामुळे यामध्ये निर्णय घेताना सर्वसमान्यांचा गोंधळ निर्माण होत असल्याचे टिळक या वेळी म्हणाले.
...म्हणून इंधन, मद्यावर जीएसटी नाही
पेट्रोल, डिझेल, मद्य यावर अद्यापही जीएसटी लागू करण्यात आलेली नाही. कारण नोटाबंदीनंतर इंधनासाठी बंद केलेल्या नोटा स्वीकारल्या जात होत्या, त्याचवेळी सरकारने ओळखले आपण इंधनाचा किती वापर करतो. त्यामुळे त्याचे दर कितीही वाढविले तरी त्याचा वापर जनता करणारच आहे, हे ओळखून त्यावर जीएसटी लावली जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भालचंद्र पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सचिन दुनाखे यांनी केले तर तर विनित जोशी यांनी आभार मानले.