गाळेधारकांनी मागितली आत्महत्येची परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:12 AM2021-07-11T04:12:49+5:302021-07-11T04:12:49+5:30
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट : मनपासमोर निदर्शने, तोडगा काढण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेच्या मुदत ...
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट : मनपासमोर निदर्शने, तोडगा काढण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे चक्क आत्महत्येची परवानगी मागितली आहे. मनपा प्रशासनाने गाळेधारकांना बजाविलेल्या बिलांमुळे गाळेधारक आर्थिक अडचणीत असून, महापालिकेकडून सातत्याने दबाव टाकून गाळ्यांवर कारवाईची धमकी दिली जात आहे. गाळेधारकांना थकीत भाड्याची अवाजवी रक्कम भरणे शक्य नसून, अशा प्रकारे बिले वसूल करण्याची धमकी मिळाली तर गाळेधारकांना आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे सांगत गाळेधारकांनी नगरविकास मंत्र्यांकडे आत्महत्येची मागणी केली आहे.
शनिवारी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे जिल्हा दौऱ्यावर आले होते. या दरम्यान, त्यांनी चोपड्याचे माजी आमदार प्रा. चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन द्वारदर्शन घेतले. या वेळी गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांच्यासह पांडुरंग काळे, राजस कोतवाल, तेजस देपुरा यांनी नगरविकास मंत्र्यांची भेट घेतली. तसेच गाळेधारक संघटनेच्या वतीने निवेदनदेखील देण्यात आले. शासनाने केलेल्या नवीन कायद्यानुसार गाळ्यांचे भाडे, कर, शुल्क फी भरायलासुद्धा गाळेधारक जिवंत राहील का नाही? की तो शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्या करेल हे कळत नाही, असेही गाळेधारकांनी या वेळी नगरविकास मंत्र्यांना सांगितले.
गाळेधारकांनी या केल्या मागण्या
१) भाडेपट्ट्याचा करार संपला त्या दिवसाच्या जुन्या भाडे दरात १०% भाडेवाढ किंवा जास्तीतजास्त डबल भाडे आकारणी करून वसुली करावी व त्या दरानेच नूतनीकरण करून द्यावे.
२) अन्यथा भाडेपट्ट्याचा करार संपला त्या दिवसाच्या रेडीरेकनरी (शीघ्र सिद्ध गणक) दराचे ‘ड’ वर्ग महानगरपालिकेसाठी २% भाडे आकारणी करून वसुली करावी व त्याच दराने नूतनीकरण करून द्यावे.
३) मासिक २% शास्ती जी वार्षिक २४% होते ती रद्द करावी.
४) करारनामा १० वर्षांऐवजी ३० वर्षांचा करण्यात यावा.
मनपासमोर केली निदर्शने
मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांनी मनपासमोर निदर्शने करीत, गाळेधारकांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी केली. १६ अव्यावसायिक मार्केटमधील गाळेधारकांबाबत मनपाने विचार करण्याची गरज असून, मनपाची अन्यायकारक बिलांची रक्कम भरणे शक्य नसल्याचेही गाळेधारकांनी या वेळी सांगितले. गाळेधारकांनी या वेळी वेगवेगळे बॅनर तयार करून, मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.