आरोग्य विभागाच्या पदोन्नतींना १० ऑक्टोबरचा मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:16 AM2021-09-25T04:16:06+5:302021-09-25T04:16:06+5:30
जळगाव : गेल्या पाच ते सहा वर्षांपासून रखडलेल्या आरोग्य विभागातील पदोन्नती तसेच कालबद्धच्या लाभापासून अनेक कर्मचारी वंचित असून गेल्या ...
जळगाव : गेल्या पाच ते सहा वर्षांपासून रखडलेल्या आरोग्य विभागातील पदोन्नती तसेच कालबद्धच्या लाभापासून अनेक कर्मचारी वंचित असून गेल्या सहा महिन्यांपासून या प्रकरणात टोलवाटोलवी सुरू आहे. पंचायत राज समितीच्या आधी हे प्रकरण निकाली काढण्यासाठी तालुकास्तरावरून कर्मचारी बोलविण्यात आले होते. मात्र, आता पीआरसीनंतर या पदोन्नत्या होणार असल्याची माहिती आहे.
या प्रकारामुळे तालुकास्तरावरून पदोन्नतीच्या कामांसाठी जिल्हा परिषदेत आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. शिवाय हा गंभीर प्रश्न पीआरसीच्या आढाव्यात गाजणार आहे. त्यातच आता १० ऑक्टोबरपर्यंत पदोन्नत्यांचा विषय मार्गी लावणार असल्याची माहिती सीईओ डॉ. पंकज आशिया यांनी दिली आहे. याकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे. आरोग्य विभागातील भोंगळ कारभाराचे नमुने सातत्याने समोर येत आहे. एका आरोग्य सेविकेचे सेवापुस्तक गहाळ झाल्याबाबत मध्यंतरी तक्रार करण्यात आली होती. किमान जिवंतपणी आपल्याला हा लाभ मिळावी, अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती. त्यातच कर्मचारी नसल्याने पदोन्नतींचा विषय रखडल्याचे सांगितले जात होते. मात्र, या विभागाला बदलीच्या माध्यमातून मोठा कर्मचारी वर्ग देण्यात आला आहे.
पदाधिकारी मांडणार भूमिका
पंचायत राज समिती सोमवारी जळगावात दाखल होणार असून सुरुवातीलाच जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी अनौपचारिक चर्चा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ही चर्चा होणार आहे. यात रखडलेल्या पदोन्नती, कुपोषण, कामे न होणे, कारवाईस विलंब अशा विविध बाबी पदाधिकारी समितीसमोर मांडणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे हे विषय येत्या तीन दिवसात गाजण्याची शक्यता आहे.