ओडीएची पाईपलाइन फुटली, लाखो लीटर पाण्याची नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 04:42 PM2019-05-13T16:42:25+5:302019-05-13T16:43:55+5:30
बोदवड तालुक्यातील २६ गावांना पाणीपुरवठा करणारी ओडीएच्या योजनेची पाईपलाईन बोदवड आणि नाडगावमध्ये फुटली. एकीकडे नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू असताना दुसरीकडे पाईपलाईन फुटल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली.
बोदवड, जि.जळगाव : तालुक्यातील २६ गावांना पाणीपुरवठा करणारी ओडीएच्या योजनेची पाईपलाईन बोदवड आणि नाडगावमध्ये फुटली. एकीकडे नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू असताना दुसरीकडे पाईपलाईन फुटल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली. जेसीबीच्या सहाय्याने खोदत असताना दोन ठिकाणी पाईपलाईन फुटण्याच्या घटना घडल्या. पहिली घटना शहरातील मुक्ताईनगर-बोदवड रस्त्यावरील नाडगाव येथील प्रतिभाताई पाटील नगरजवळ १३ रोजी पहाटे दोनच्या सुमारास, तर दुसरी घटना सकाळी सातला बोदवड शहातील जुन्या तहसीलजवळ घडली.
सद्य:स्थितीत ओडीएची पाईपलाईन जीर्ण झालेली आहे. या ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी सध्या जेसीबीच्या सहाय्याने खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे. हे खड्डे खोदत असताना ओडीएच्या जीर्ण पाईपलाईनला जेसीबी यंत्रणा धक्का लागला आणि जीर्ण पाईपलाईन फुटली. मुक्ताईनगर-बोदवड रस्त्यावरील नाडगाव येथे सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास ही घटना घडली. परिणामी पहाटेपासून तर दुपारपर्यंत हजारो लीटर शुद्ध पाण्याची नासाडी झाली. ही जीर्ण पाईपलाईन सोमवारी दुपारी दोन-अडीचच्या सुमारास जोडण्यात ओडीएच्या कर्मचाऱ्यांना यश आल्यानंतर रस्त्यावरून पाणी वाहणे थांबले.
दरम्यान, पहाटे नाडगाव येथील पाईपलाईन फुटल्यानंतर काही वेळातच बोदवड शहरातील जुन्या तहसील भागातही ओडीएची जीर्ण पाईपलाईन फुटली. येथूनही हजारो लीटर पाण्याची नासाडी झाली. सायंकाळपर्यंत ही पाईपलाईन जोडली गेली नव्हती. या पाईपपाईनमधूनही कमी-अधिक प्रमाणात पाण्याचा लोंढा वाहणे सुरूच होेता. यामुळे वाहते पाणी पूर्ण दुय्यम निबधक कार्यालय, तलाठी कार्यालयापर्यंत वाहत होते.
बोदवड शहरात गेल्या १५ दिवसांपूर्वी पाणीपुरवठा झालेला आहे. ओडीएचे पाणी येण्याचा आज वार होता. परंतु नेमकी पाईपलाईन फुटल्याने बोदवडकरांना पाणी मिळालेच नाही. नागरिकांचे पाण्यावाचून हाल होण्याचे सत्र सुरूच आहे. अशा परिस्थितीत नवीन पाईप तयार करण्याच्या कामाला गती देण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.