‘ओडीए’चा पाणीपुरवठा पुन्हा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 08:42 PM2018-12-15T20:42:26+5:302018-12-15T20:44:49+5:30
गत महिन्यात महिनाभरानंतर आलेला ओडीए (प्रादेशिक पाणीपुरवठा) योजनेतून थकीत वीज बिलामुळे खंडित झालेला पाणीपुरवठा सुरू झाला होता. त्याला २० दिवस उलटत नाही तोच पुन्हा नोव्हेंबर महिन्याची २५ लाख रुपयांची थकबाकी वाढल्यामुळे दि. १४ रोजी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
बोदवड, जि.जळगाव : गत महिन्यात महिनाभरानंतर आलेला ओडीए (प्रादेशिक पाणीपुरवठा) योजनेतून थकीत वीज बिलामुळे खंडित झालेला पाणीपुरवठा सुरू झाला होता. त्याला २० दिवस उलटत नाही तोच पुन्हा नोव्हेंबर महिन्याची २५ लाख रुपयांची थकबाकी वाढल्यामुळे दि. १४ रोजी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
गत महिन्यात तीन कोटी ९० लाख रुपयांची वीज बिलाची थकबाकी झाली. यामुळे बोदवड, मुक्ताईनगर व भुसावळ तालुक्यातील सुमारे ८० गावांचा पाणीपुरवठा ठप्प झाला होता. त्याला सुरू करण्यासाठी १३ लाख रुपयांचे चालू वीज बिल व रोहित्र बसवल्याने पाणी सुरू झाले होते तर या टंचाईग्रस्त जिल्ह्याच्या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवावे. तसेच दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करू नये, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठकीत सांगूनही वीज वितरण कंपनीने पूर्वसूचना न देता ओडीएचा पाणीपुरवठा खंडित केला, त्यांच्या शब्दालाही केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे ८० गावांना पाणीटंचाईचे संकट पुन्हा सुरू झाले आहे.
याबाबत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी साधना नरवाडे यांची प्रतिक्रिया घेतली असता, वीज बिल २५ लाख आले आहे. वीज वितरण कंपनीने पूर्वसूचना न देता पुन्हा वीजपुरवठा खंडित केला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन माहिती दिली असून, त्यांनी वीज वितरण कंपनीशी बोलण्याचे सांगितले आहे.