चुकीचे औषध दिल्याने डॉक्टरसह विक्रेत्यावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 12:17 AM2019-08-06T00:17:22+5:302019-08-06T00:17:52+5:30
अमळनेर : आठ महिन्यांपूर्वी डॉक्टरने दिलेल्या चुकीच्या औषधामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय समितीने अहवाल दिल्यावरून एका डॉक्टरसह औषधी विक्रेत्यावर ...
अमळनेर : आठ महिन्यांपूर्वी डॉक्टरने दिलेल्या चुकीच्या औषधामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय समितीने अहवाल दिल्यावरून एका डॉक्टरसह औषधी विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शालीकराम परशुराम महाजन (वय ४२) यांना २६ जानेवारी २०१९ ला खोकल्याचा त्रास जाणवत होता. तीन दिवसापासून खोकला जात नसल्याने त्यांनी त्रिकोणी बागेजवळील द्वारका क्लिनिकमधील डॉ.पद्मनाभ पाटील यांच्याकडे उपचारासाठी धाव घेतली. यावेळी डॉ. पाटील यांनी त्यांना अॅझीथ्रो २५० एमजी (सहा गोळ्या) व रेफी कोल्ड (सहा गोळ्या) ही औषधी लिहून दिली. ही चिठ्ठी घेऊन रूग्ण शालीकराम हे गजानन मेडिकलचालक किशोर श्रीकिसन लाखोटे यांच्याकडे गेले. त्यांनी पहिली गोळी बरोबर दिली. मात्र, दुसरी डॉक्टरांनी न लिहून दिलेली सिनोडेक कोल्ड ही गोळीही दिली. या गोळ्या सेवन केल्याने त्याचा दुष्परिणाम होऊन त्यांची प्रकृती अधिक खालावली. त्यानंतर त्यांना एका खासगी रूग्णालयात दाखल केले असता त्यांचा २७ जानेवारी २०१९ ला मृत्यू झाला.
याप्रकरणी शालीकराम यांच्या पत्नी विद्या महाजन यांनी दिलेल्या फियार्दीवरून येथील पोलीस ठाण्यात डॉ. पद्मनाभ पाटील व मेडिकलचालक किशोर किशोर लखोटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. डॉ. पाटील हे बीएएमएस डॉक्टर असून, त्यांनी आयुर्वेदिक गोळ्या लिहून देण्याऐवजी अॅलॉपॅथीची औषधे लिहून त्या गोळ्या सेवन करण्याचा सल्ला दिला. तसेच औषधी चालकानेही चुकीची गोळी दिल्याने दोघांच्या हलगर्जीपणाने त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याबाबत विद्या महाजन यांनी याप्रकरणी आठ महिन्यांपासून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता. या प्रकरणाची सर्व वैद्यकीय कागदपत्रे, विच्छेदन अहवाल आदी कागदपत्रांची पडताळणी करून हा अहवाल जिल्हा वैद्यकीय अधिका-यांकडे पाठवण्यात आला होता. या अहवालावरून वैद्यकीय अधिकारी यांनी निष्कर्ष काढला. त्यावरून चुकीचे औषध सेवन केल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. अमळनेर पोलीस स्टेशनला संबंधितांवर गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या मार्गदशनखाली प्रभाकर पाटील करीत आहेत.