जळगाव तालुक्यातील १९७ बीएलओंवर आज दाखल होणार गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 07:20 PM2017-11-26T19:20:18+5:302017-11-26T19:21:43+5:30
दुपारपर्यंत काम सुरू करण्याची संधी: तहसीलदार निकम यांचा इशारा
जळगाव: मतदार याद्या पडताळणी व नोंदणीसाठी तालुक्यात नेमलेल्या ४६० बीएलओंपैकी शहरातील १५८ व तालुक्यातील ग्रामीण भागातील ३९ अशा एकूण १९७ बीएलओंनी कारवाईचा इशारा देऊनही अद्याप कामच सुरू केलेले नाही. या बीएलओंना सोमवार दि.२७ रोजी दुपारपर्यंतची अंतीम संधी देण्यात आली असून दुपारपर्यंत कामाला सुरवात न केल्यास त्यांच्याविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी ‘लोकमत’ला दिली.
छायाचित्रासह मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी जास्तीत जास्त अचूक होण्यासाठी व मतदारांना मतदान विषयक चांगल्या सुविधा देता याव्यात याकरिता या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांनी (बीएलओ) घरोघरी भेट देवून मतदारांची पडताळणी व नोंदणी करण्याचे भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार शहरात ३८२ व तालुक्यातील ग्रामीण भागात ७८ बीएलओंची नियुक्ती करण्यात आली आहे.
१५ तारखेला या मोहीमेला सुरूवात झाली असल्याने शहरातील ३८२ व तालुक्यातील ग्रामीण भागातील ७८ बीएलओंनी केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी शुक्रवार, २४ रोजी तालुक्यातील बीएलओंची बैठक तहसीलदार अमोल निकम, नायब तहसीलदार रूपाली काळे यांच्या उपस्थितीत झाली. त्यात बीएलओंनी अडचणींचा पाढा वाचला होता. ज्या कर्मचाºयांची बीएलओ म्हणून नियुक्ती होऊनही त्यांनी अद्यापही काम सुरू केलेले नसेल, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा तहसीलदार निकम यांनी दिला होता. मात्र शनिवार, दि.२५ रोजीही या बीएलओंनी कामाला सुरूवात केलेली नव्हती. त्यामुळे तहसीलदार कार्यालयाने या बीएलओंवर कारवाईची तयारी केली आहे. मात्र त्यांना सोमवार, दि.२७ रोजी दुपारपर्यंत अखेरची संधी दिली आहे. या कालावधीपर्यंत या बीएलओंनी कामास सुरूवात न केल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.