कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:14 AM2021-05-30T04:14:30+5:302021-05-30T04:14:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : फ्रंटलाइन वर्कर्सचा दर्जा देण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी महावितरणच्या कृती समितीचे सहाव्या दिवशी आंदोलन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : फ्रंटलाइन वर्कर्सचा दर्जा देण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी महावितरणच्या कृती समितीचे सहाव्या दिवशी आंदोलन सुरूच होते. दरम्यान, आपल्या मागण्यांबाबत कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन, त्यांनाही आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर आपल्या मागण्यांवर ठाम राहून आंदोलनकर्ते कार्यालयीन व्हॉट्सॲप ग्रुपमधून पडले बाहेर आहेत.
कोरोनाच्या भयावह परिस्थितीतही काम करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना फ्रंटलाइन वर्कर्सचा दर्जा देण्यासह, वीज कर्मचाऱ्यांचे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे लसीकरण करावे, कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या वीज कर्मचाऱ्याला महाराष्ट्र शासनाप्रमाणे ५० लाख रुपये अनुदान द्यावे, कोरोनामुळे वीज बिल वसुलीची सक्ती करू नये आदी मागण्यांसाठी कृती समितीने शासनाला नोटीस देऊनही शासनातर्फे वीज कर्मचाऱ्यांच्या कुठल्याही मागण्या मान्य केलेल्या नाहीत. तसेच याबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी कृती समितीच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची चर्चा होऊनही यातूनही अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे कृती समितीने जोपर्यंत शासनाकडून मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या कामगार संघटनांचे जळगाव झोनसह राज्यभरात कामबंद आंदोलन सुरू आहे. शनिवारी आंदोलनाचा सहावा दिवस होता.
दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या या कामबंद आंदोलनामुळे महावितरणचे प्रशासकीय कामकाज चांगलेच खोळंबले आहे.
इन्फो :
आंदोलनकर्ते कार्यालयीन व्हॉट्सॲप ग्रुपमधून पडले बाहेर
महावितरण, महापारेषण आणि महानिर्मितीमधील प्रमुख सहा संघटनांच्या संयुक्त कृती समितीने आपल्या मागण्या मान्य होत नसल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन, आपल्या मागण्यांबाबत निवेदन दिले. यावेळी पराग चौधरी, कुंदन भंगाळे, वाय. सी. भंगाळे, देवेंद्र भंगाळे, सुहास चौधरी, नितीन चौधरी, मिलिंद इंगळे, मोहन भोई, हर्षल नेहेते, वीरेंद्रसिंग पाटील, जे.एन. बाविस्कर, पी.वाय. पाटील, नाना पाटील, आर.आर. सावकारे, विजय मराठे, ज्ञानेश्वर पाटील, चतुर सैंदाणे, प्रदीप पाटील उपस्थित होते. दरम्यान, यानंतर सर्व अधिकारी -कर्मचारी कार्यालयीन व्हॉट्सॲप ग्रुपमधून बाहेर पडले आहेत.