भडगाव तहसील कार्यालयात पासर्डीचे ग्रामस्थ झाले आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 03:43 PM2019-06-08T15:43:39+5:302019-06-08T15:43:46+5:30
दुकानाचा परवानाच रद्द करण्याची मागणी
कजगाव, ता. भडगाव : येथून जवळच असलेल्या पासर्डी ता.भडगाव येथील स्वस्त धान्य दुकानदाराच्या मनमानी कारभारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. ६ रोजी भडगाव येथील तहसील कार्यालयाकडून काही अधिकारी आले होते. त्यांच्या समोरच या असंतोषाचा भडका उडाला.
येथील स्वस्त धान्य दुकानदारास ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. स्वस्त धान्य दुकानदार राजू मिस्तरी व ग्रामस्थांमध्ये हुज्जत झाली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पासर्डी येथील रेशन दुकानदार राजू मिस्तरी स्वस्त धान्य दुकानाचा माल काळ्या बाजारात विकत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला त्यामुळे येथील अनेक नागरिकांना स्वस्त धान्यापासून वंचीत रहावे लागत होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात पासर्डी गावात मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला होता.
कार्यवाही सुरू असतानाच दुकानदार व ग्रामस्थांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे गावात काही काळ तणावग्रस्त स्थिती होती. या दुकानदारावर तत्काळ कारवाई करून त्याच्या कडील स्वस्त धान्य दुकान त्वरित काढून टाकावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
प्रसंगी भडगाव येथील पुरवठा निरीक्षक किशोर महाले कजगावचे तलाठी बी. एम.परदेशी, पासर्डीचे सरपंच बाळू पाटील, ग्रामसेवक उमेश परदेशी, कोतवाल नितीन कोळी, माजी सरपंच वासुदेव पाटील, ग्रा. प. सदस्य सुनील सोनवणे, मंगलबाई सोनवणे, विकासो चेअरमन प्रताप पाटील, छावा संघटनेचे भगवान पाटील, मनसेचे कैलास जाधव, जयराम पाटील, राजेंद्र पाटील, वाल्मिक कोळी, नामदेव वाघ व शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, या घटनेची पासर्डी मोठी चर्चा सुरू आहे. ग्रामस्थांना धान्य मिळाले पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी याठिकाणी दाखल होत नागरिकांची समजूत काढली.
दुकानदार दोषी आढळल्यास कारवाई
गावातील एका नागरिकाने वरिष्ठस्थरावर तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेवून पाचोरा उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी पासर्डी गावाला भेट दिली व योग्य त्या सूचना पुरवठा व संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. त्या प्रमाणे पुरवठा विभागाचे अधिकारी यांनी पासर्डी गावाला भेट दिली व दुकानदार व ग्रामस्थ यांच्याशी चर्चा केली. रेशन दुकानदार दोषी आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन ग्रामस्थांना दिले. तरीदेखील ग्रामस्थांचा असंतोष कमी झाला नव्हता. त्यांनी दुकानाचा परवानाच रद्द करण्याची मागणी अधिकाºयांकडे केली.त्यामुळे वातावरण आणखी तापले होते.