जळगाव कृउबामध्ये कार्यालयाची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:17 AM2021-03-17T04:17:28+5:302021-03-17T04:17:28+5:30
जळगाव : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी स्थानिक व्यापाऱ्यांनी दादरचे दर तब्बल ७०० ते ८०० रुपयांनी कमी ...
जळगाव : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी स्थानिक व्यापाऱ्यांनी दादरचे दर तब्बल ७०० ते ८०० रुपयांनी कमी केल्यामुळे संतापलेला शेतकऱ्यांनी बाजार समितीमधील लिलाव प्रक्रिया बंद केली. तसेच सचिव कार्यालयामध्ये जाऊन दरवाजाची काच फोडून तोडफोड केल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.
गेल्या पंधरा दिवसापासून जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांच्या दादरला ३५०० ते ३ हजार रुपयांचा प्रति क्विंटल इतका भाव मिळत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून दादरचे भाव तब्बल ७०० ते ८०० रुपयांनी कमी झाले आहेत. तसेच लिलावादरम्यान व्यापाऱ्यांकडून २२०० रुपयांपर्यंतचे दर दिले जात आहे. त्यातच व्यापाऱ्यांकडून दादरी वर दोन किलो ची कट्टी देखील लावला जात आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास असोदा, भादली व कडगाव या भागातील शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी आणला असताना व्यापार्यांनी अचानक भाव कमी केल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. तसेच खाजगी बाजारात दादरला चांगला भाव असतानादेखील अचानकपणे भाव कमी केल्याने शेतकरी व व्यापारामध्ये काही काळ वाद निर्माण झाला.