साई मार्केटींग आणि वॉटरग्रेस दोघांचेही कार्यालय वेगवेगळेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:42 AM2020-12-11T04:42:27+5:302020-12-11T04:42:27+5:30
जळगाव : साई मार्केटींग व रमेश मोटार ड्रायव्हींग स्कूल यांचे कार्यालय एकाच ठिकाणी असून वॉटरग्रेसचे कार्यालय मात्र या दोघांपासून ...
जळगाव : साई मार्केटींग व रमेश मोटार ड्रायव्हींग स्कूल यांचे कार्यालय एकाच ठिकाणी असून वॉटरग्रेसचे कार्यालय मात्र या दोघांपासून किमान शंभर ते दीडशे फूट अंतरावर आहे. त्याला तारेचे कंपाऊड करण्यात आले असून त्यात पत्र्याची एक खोली वॉटरग्रेससाठी दाखविण्यात आली आहे, तर मोकळ्या जागेत रमेश मोटार ड्रायव्हींग स्कूलची वाहने पार्कींग करण्यात आलेली आहेत. सुनील झंवर यांचे कार्यालय व वॉटरग्रेसचे कार्यालय एकाच ठिकाणी असल्याचा दावा केला जात असल्याने गुरुवारी ‘लोकमत’ प्रत्यक्ष जावून पाहणी केली असता हा प्रकार उघड झाला.
खान्देश मील कॉम्पलेक्समधील गाळा क्र.३२ व ४३ यात सुनील झंवर याचे रमेश मोटार ड्रायव्हींग स्कूलचे कार्यालय असून तसा फलक लावण्यात आलेला आहे. या दोन्ही गाळ्यांच्या मध्ये कागदावर काढलेली प्रिंट भींतीवर चिटकविण्यात आली असून ४२ क्रमांकाचा गाळा साई मार्केटींग ॲण्ड ट्रेडींग कंपनीकरीता दाखविण्यात आले आहे. या दोन्ही गाळ्यांना सील लावण्यात आलेले होते तर तेथे दोन पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले दिसून आले. या कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता,याबाबत आम्हाला काहीच माहिती नाही, या कार्यालयाचे संरक्षण करणे इतकीच आमची जबाबदारी असल्याचे या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.
पत्र्याच्या खोलीत वॉटरग्रेसचे कार्यालय
रमेश मोटार ड्रायव्हींग स्कूलच्या कार्यालयापासून किमान शंभर ते दीडशे फूट अंतरावर तसेच गोविंदा रिक्षा थांब्याच्या समोरच मोकळ्या जागेत तारेच्या कंपाऊडमध्ये पत्र्याच्या खोलीत वॉटरग्रेसचे कार्यालय आहे. हे कार्यालय उघडे होते व मोकळ्या जागेत रमेश मोटार ड्रायव्हींग स्कूलची वाहने लावलेली होती. त्यामुळे वॉटरग्रेस व रमेश मोटार ड्रायव्हींग स्कूल कनेक्शन असल्याचे उघड होते. पुणे पोलिसांच्या झडतीतही रमेश मोटार ड्रायव्हींगस्कूलच्या कार्यालयात वॉटरग्रेसच्या कामगारांची एटीएम कार्ड आढळून आली होती. एकत्रित या सर्वांशी सुनील झवर याचे कनेक्शन असल्याचे उघड होते.