जन्मभूमीतल्या टॅलेंटसाठी अधिकाऱ्यांची ‘मदत साखळी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 08:34 PM2018-08-14T20:34:37+5:302018-08-14T20:35:44+5:30
चाळीसगावात साकारली अभ्यासिका
चाळीसगाव, जि.जळगाव : माणसाला प्रगतीची चाके लागली की, त्याला आपल्या जन्मभूमीचा विसर पडतो. यशाची आतषबाजी त्याची नाळ तोडून टाकते अर्थात याला चाळीसगावच्या जन्मभूमीतील अधिकारी अपवाद ठरले आहेत. ‘गे मायभू तुझे फेडीन पांग सारे...’ असा संकल्प करणाºया अधिकाºयांची साखळी जोडण्याचे काम डॉ.उज्ज्वला देवरे करीत आहे. आपल्या मायभूमीतील टॅलेंटला यशाची झळाळी देण्यासाठी हे अधिकारी पुढे सरसावले असून, डॉ. देवरे यांनी स्वखर्चाने अभ्यासिकाही उभारली आहे.
स्पर्धा परीक्षांचा लक्ष्यभेद करणे अवघड आहेच. तथापि, त्यासाठी लागणारे अभ्यासाचे साहित्य, सखोल मार्गदर्शन यांची ग्रामीण भागात आजही वानवा आहे. महानगरात क्लासेस उपलब्ध असतात. परंतु त्यांचे आणि ग्रंथालयांचे शुल्क भरणे अनेकांना शक्य होत नाही. यामुळे अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न भंग पावते. सर्वसामान्य कुटुंंबातील मुले या वर्तुळातून बाहेर फेकले जातात. टॅलेंट असूनही त्यांच्या पदरी निराशा येते. हे बदविल्यासाठी 'अधिकाºयांचे भावी अधिकाºयांसाठी मिशन' ही चळवळ उभी राहत आहे. यासाठी डॉ. देवरे फाऊंडेशनने अधिकाºयांची साखळी जोडायला सुरुवात केली आहे.
डॉ. उज्ज्वला व डॉ. जयवंत देवरे यांचे सुपुत्र डॉ. अर्जुन देवरे यांनी २०१३ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेत यश मिळविले. सद्य:स्थितीत ते ब्राझील येथे राजदूत आहे. मुलाच्या यशातून देवरे दाम्पत्याला अधिकाºयांची साखळी जोडण्यासह अभ्यासिका उभारण्याचा मार्ग गवसला. गेल्या काही वर्षात चाळीसगाव येथील डॉ. उज्वलकुमार चव्हाण, डॉ. प्रवीण चव्हाण, डॉ. कविता पाटील, अक्षय पाटील यांनी स्पर्धा परीक्षेचा अचूक लक्ष्यभेद केला आहे. हा टक्का अजून वाढवा. यासाठीच १८ रोजी अभ्यासिकेचे लोकार्पण होत आहे.
लक्ष्मीनगरात डॉ.देवरे रुग्णालयाच्या परिसरातच ही अभ्यासिका डॉ. देवरे यांनी स्वखर्चाने उभारली असून येथे स्पर्धा परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांना मोफत अभ्यास साहित्य उपलब्ध करुन दिले जाणार आहे. विशेष म्हणजे अभ्यासिकेत वर्षभर मूळ चाळीसगावकर असणारे आणि इतर अधिकारीही मार्गदर्शन करणार आहेत.
१८ रोजी औरंगाबाद येथील सहायक आयकर आयुक्त विष्णु औंटी हे मार्गदर्शनाचे पहिले पुष्प गुंफणार आहेत. यावेळी प्रो. संजय मोरे हे करिअर मार्गदर्शक तर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक अभिजित पवारदेखील उपस्थित राहणार आहेत.
चाळीसगाव तालुक्यात असणाºया टॅलेंटला व्यासपीठ मिळावे. यासाठी अधिकाºयांची मार्गदर्शन साखळी आणि अभ्यासिकेचा उपक्रम योजिला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत मोफत मार्गदर्शनही उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
-डॉ.उज्ज्वला देवरे, अध्यक्षा, डॉ.देवरे फाऊंडेशन, चाळीसगाव