आॅनलाईन सीमा तपासणी नाके ठरताहेत आॅफलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 09:13 PM2019-05-20T21:13:07+5:302019-05-20T21:13:54+5:30
खानापूर येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणाद्वारे सद्भाव ग्रुपकडून बीओटी तत्त्वावर उपप्रादेशिक परिवहन विभाग, जीएसटी व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नव्याने उभारण्यात आलेले इनकॅमेरा व आॅनलाईन अद्ययावत असे एकात्मिक पद्धतीचे नाके धुळखात पडून आहे.
रावेर, जि.जळगाव : खानापूर येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणाद्वारे सद्भाव ग्रुपकडून बीओटी तत्त्वावर उपप्रादेशिक परिवहन विभाग, जीएसटी व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नव्याने उभारण्यात आलेले इनकॅमेरा व आॅनलाईन अद्ययावत असे एकात्मिक पद्धतीचे नाके धुळखात पडून आहे. आर.टी.ओ.विभागाला शासनाच्या स्थलांतर आदेशाची प्रतीक्षा आहे.
वरकमाईला चापसाठी संकल्पना
रावेर तालुक्यातील चोरवड या मध्य प्रदेश सीमेवरील उपप्रादेशिक परिवहन विभागाचे सीमा तपासणी नाके खानापूर उड्डाणपूलाजवळील टोलनाक्यावर स्थलांतरित करण्याची प्रक्रिया गत दोन वर्षापासून सुरू आहे. चेकपोस्ट नाक्यावर पंटरांकरवी शासनाच्या कर वसुलीला हरताळ फासून होणाऱ्या वरकमाईला चाप लावण्यासाठी शासनाने उपप्रादेशिक परिवहन विभाग, जीएसटी कर विभाग व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त पद्धतीचे एकाच छताखाली आॅनलाईन एकात्मिक सीमा तपासणी नाक्यांची संकल्पना अंमलात आणली आहे.
तीन टनकाट्यांसह टोलनाक्यांची उभारणी
शासनाच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाने महाराष्ट्र रस्ता विकास महामंडळाद्वारे ही एकात्मिक आॅनलाईन सीमा तपासणी नाके उभारण्याची योजना युद्धपातळीवर राबवली आहे. सद्भाव ग्रुप या यंत्रणेकडून बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर खानापूर उड्डाण पुलाच्या टोलनाक्यावर सदरील एकात्मिक सीमा तपासणी नाके गत दोन वर्षांपासून उभारण्याची प्रक्रिया सुरू होती. सीसीटीव्ही आॅनलाईन कॅमेऱ्यांसह तीन टनकाट्यांसह टोलनाके उभारण्यात आले आहे. संबंधित तीनही विभागांचे संगणकीय अद्ययावत कक्ष, अधिकारी निवास, कर्मचारी निवास, वाहनधारक व प्रवाशांकरीता स्वच्छतागृह अशी सुसज्ज व अद्ययावत नाक्याची उभारणी पूर्णत्वास आली आहे. त्याला वर्ष लोटले आहे.
वाहनांची गर्दी आॅफलाईन नाक्यावर
मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पुरनाड एकात्मिक आॅनलाईन सीमा नाके इनकॅमेरा सुरू असल्याने दंडात्मक कराचा भुर्दंड टाळण्यासाठी क्षमतेपेक्षा जास्त भार असलेल्या अवजड वाहनांच्या ताफ्याची रहदारी अंकलेश्वर- बºहाणपूर राज्य महामार्गावरील आॅनलाईन नसलेल्या आॅफलाईन नाक्यावर वाढली आहे.
चार-पाच वर्षांपूर्वी आघाडी सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन परिवहन राज्यमंत्री संजय सावकारे यांनी चोरवड सीमा तपासणी नाक्यावर धाड टाकून मोटार वाहन निरीक्षकांना कार्डच्या लिंकींग पध्दतीने सुरू असलेल्या वरकमाई संदर्भात कानउघाडणी केली होती. नव्याने अद्ययावत उभारलेले तपासणी टोलनाक्यावर स्थलांतरित करण्याबाबत हेतूत: टाळाटाळ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
खानापूर उड्डाणपूलाच्या टोलनाका परिसरात सद्भाव ग्रुृप कंपनीकडून बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर उपप्रादेशिक परिवहन विभाग, जीएसटी करविभाग व राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे एकात्मिक सीमा तपासणी नाके उभारण्यात आले आहे. काम पूर्ण होऊन सात-आठ महिने झाले आहेत. मात्र उपप्रादेशिक परिवहन विभागाला शासनाकडून स्थलांतरणाचे आदेश प्राप्त झालेले नाहीत.
-योगिराज बाविस्कर, व्यवस्थापक, सद्भाव ग्रुप कंपनी, चोरवड एकात्मिक सीमा तपासणी नाके, खानापूर