नवीन प्रणाली लागू होईपर्यंत ऑफलाइन बांधकाम परवानगी मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:37 AM2021-01-13T04:37:15+5:302021-01-13T04:37:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बांधकाम परवानगीसाठी राज्य शासनाने नुकतीच एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली मंजूर केली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बांधकाम परवानगीसाठी राज्य शासनाने नुकतीच एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली मंजूर केली असून, ही नियमावली जळगाव महापालिकेसाठीदेखील लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अजून काही महिने नवीन नियमावलीनुसार ऑनलाइन परवानगी घेण्यासाठी नवीन प्रणाली लागू होऊ शकत नाही. त्यामुळे काही महिने नागरिकांनी नवीन नियमावलीअंतर्गत बांधकाम परवानगीसाठी मनपात ऑफलाइन अर्ज करावे, असे आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नगररचना विभागात जुन्या नियमावलीनुसार ऑनलाइन अर्ज करावा लागतो त्यानंतरच ही परवानगी मिळत असते. मात्र, नव्याने जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीसाठी आवश्यक सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम अद्यापपर्यंत पूर्ण करण्यात आलेले नाही. यासाठी अजून काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. ऑनलाइन अर्ज दाखल केले तर ते जुन्याच पद्धतीने होतील. त्यामुळे ते ग्राह्य धरले जाणार नाहीत. त्यामुळे नव्याने व नवीन बांधकाम नियमावलीनुसार बांधकाम परवानगी घेण्यासाठी ऑफलाइन अर्ज दाखल करावेत, अशा आशयाचे आदेश राज्याचे नगररचना संचालक राजेश नाईक यांनी काढले आहेत. याबाबतचे आदेश जळगाव महापालिकेकडे प्राप्त झाले असून, नागरिकांनी काही दिवस ऑफलाइन पद्धतीनेच अर्ज दाखल करावे, असे आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.