अरे देवा! सरपंचांकडेही १२ दिवसांपासून पाणी नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 10:27 AM2022-03-21T10:27:29+5:302022-03-21T10:27:59+5:30
Jalgaon : पाणीपुरवठ्याचे नियोजन नसल्यामुळे गावात पाणी लॉबी जोरात आहे, तर जलवाहिनीची दुरुस्ती ग्राम पंचायतीसाठी डोकेदुखी ठरली आहे.
जळगाव : वारंवार फुटणारी जलवाहिनी, पाणीपुरवठा योजनेचा खंडित झालेला वीजपुरवठा यामुळे कुसुंबा खुर्द गावाला तब्बल १२ दिवस होऊनही पाणी मिळालेले नाही. सरपंच इंदुबाई पाटील यांचे घरही त्यासाठी अपवाद ठरले नाही. दरम्यान, पाणीपुरवठ्याचे नियोजन नसल्यामुळे गावात पाणी लॉबी जोरात आहे, तर जलवाहिनीची दुरुस्ती ग्राम पंचायतीसाठी डोकेदुखी ठरली आहे.
जळगाव एमआयडीसीला लागून कुसुंबा खुर्द आहे. औरंगाबाद महामार्गामुळे गावाची जुने व नवीन अशी विभागणी झाली आहे. ग्राम पंचायत कार्यालय, पाणीपुरवठ्याची मुख्य विहीर जुन्या गावात आहे. त्यावरून गणपतीनगर व महादेव मंदिर भागातील पाण्याची टाकी भरली जाते. नवीन गावातील तुळजाईनगर व परिसरासाठी स्वतंत्र टाकी असून, त्यात मन्यारखेडा तलावाजवळील विहिरीतून पाणी भरले जाते.
विस्तारीत भागात १२ दिवसांपासून पाणी न आल्याने संतप्त महिलांनी शनिवारी, ग्राम पंचायत कार्यालयाला कुलुप ठोकले होते. त्यामागील कारणांचा शोध घेताना माहिती मिळाली, की पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचा वीजपुरवठा खंडित झालेला होता. नवीन भागात बांधकामे सुरू आहेत. तेथे साहित्य घेऊन येणारे ट्रक, ट्रॅक्टर यामुळे जलवाहिनी फुटली होती. दुरुस्तीचे काम सोमवारी, केले जाणार असले तरी इतके दिवस त्यासाठी विलंब केला गेल्यामुळे महिलांच्या संतापाच्या उद्रेक झाला.
टॅंकर व पाण्याच्या जारची लॉबी जोरात
नियमित पाणी मिळत नसल्याने लोकांना महिन्यातून दोनदा टँकर आणावा लागतो. पाचशे रुपयात ४ हजार लीटर पाणी मिळते. ग्राम पंचायतीच्या विहिरींवर फिल्टरेशन प्लँट नाही. त्यामुळे जारच्या पाण्याला चांगली मागणी आहे. गावातच शुद्ध पाण्याचे जार भरून देणारे सात ते आठ प्लँट आहेत. ते जोरात चालतात. त्यांच्या रिक्षा सकाळपासून गावात घरोघरी पाण्याचे जारचे वितरण करीत असतात.
प्रत्येकाला जार, टँकर कसे परवडेल
२० वर्षांपूर्वी गावात २ ते ३ हजार लोकसंख्या होती. आता ८ ते १० हजार आहे. बहुतेक जण एमआयडीसीमधील उद्योगात कामाला जातात. प्रत्येकाला टँकर, जारचा खर्च कसा परवडेल ? असा प्रश्न गावातूनच उपस्थित होत आहे.
विहिरीची स्वच्छता आवश्यक
जुने गावातील पाणी पुरवठ्याच्या विहिरीची स्वच्छता होणे आवश्यक आहे. तिच्यात सध्या वाळलेली पाने, प्लास्टीक पिशव्या पडलेल्या आहेत. त्यामुळे पाणी खराब झाले आहे. ते पिण्यालायक नाही.
२५ वर्षांपासून पाणी योजनेचे बिल थकित
दीड वर्षांपूर्वी ग्राम पंचायतीची निवडणूक झाली. १७ सदस्य आहेत. फेब्रुवारी २०२१ मध्ये सरपंचपदी इंदुबाई पाटील यांची निवड झाली. त्यांचा मुलगा संतोष पाटील यांनी गावातील पाणी समस्येची माहिती दिली. वाढीव भागात दीड फूट खोलीवरच ६ इंची पाइपलाइन आहे. त्यावरून वाहने गेली, की ती वारंवार फुटते. लोकांनी काळजी घेतली पाहिजे. दीड महिन्यांपूर्वी जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पाइपलाइन टाकण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले. नवीन विहीर प्रस्तावित आहे. गाव वाढल्यावर समस्याही वाढल्या. २० वर्षांपूर्वी एमआयडीसीमधून पाणी आणावे लागत होते. २५ वर्षांपासून पाणी योजनेचे वीज बिल थकित आहे. त्यापैकी ४० हजार रुपये नुकतेच भरले. त्यामुळे विहिरीचा वीजपुरवठा सुरळीत होईल, असे संतोष पाटील म्हणाले.
नवीन भागात पाइपलाइन फुटल्यामुळे पाणी येत नाही. त्यामुळे महिन्यातून दोनदा टँकर आणावे लागते. या समस्येवर लवकर उपाय केला पाहिजे.
- सुरेश पाटील, कुसुंबा