अरे देवा...फवारणी करताच जळाली कपाशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 08:58 PM2020-09-09T20:58:34+5:302020-09-09T20:58:41+5:30
संकटाची मालिका संपेना : शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ
पिंपळगाव हरे, ता. पाचोरा : येथून जवळच असलेल्या सावखेडा गावी कोमल अनिल पाटील (२३) व त्याची आई निर्मलाबाई अनिल पाटील यांनी आपल्या नफ्याने घेतलेल्या पाच ते साडेपाच एकर शेतात कपाशीची लागवड केली आहे. या कपाशीची चांगली वाढ व्हावी म्हणून त्यांनी कीटकनाशकांची फवाणी केली. मात्र त्याचा उलट परिणाम होऊन कपाशीची पाने जळून गेली. मोठे नुकसान झाल्याने हा तरुण शेतकरी हतबल झाल्याची स्थिती आहे.
सावखेडा या लहानशा गावात राहणारा कोमल पाटील. वडील नसल्याने संपूर्ण घराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन आईच्या मदतीने शेती करत असतो. गरिबी असली तरी त्याने एका शेतकºयाची जमीन कसण्यासाठी नफा तत्त्वावर घेतली होती. स्वत:जवळ जास्त पैसा नसल्याने इतरांजवळून पैशांची जमवाजमव करून मोठ्या हिमतीने शेतात कपाशीची लागवड केली. कपाशीचे उत्पादन चांगले येईल असे स्वप्न तो पहात असताना. कपाशीवर त्याने कीटकनाशकांची फवारणी केली. आणि झाले उलटेच. कपाशीची सर्व पाने जळून गेली आहे.
ऐन फुलण्याच्या स्थितीत कपाशी असताना ती करपल्याने फार मोठे नुकसान झालेले आहे. सावखेडा गावातीलच एका कृषी केंद्रावरून कीटकनाशकांची खरेदी त्याने केली होती. कपाशीवरील रस शोषण करणारी कीड, अळी व अळींचे अंडे यांचा बंदोबस्त न होता कपाशीचे पाने जळाल्याने या शेताची अधिकाऱ्यांनी पहाणी करावी व या तरुण शेतकºयाला मदत करावी अशी अपेक्षा परिसरातील शेतकºयांकडून होत आहे.
या संदर्भात त्यांने कृषी अधिकारी पारोळा यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार केली असून शेतात अधिकाºयांनी यावे व पाहणी करून मदत करावी, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली आहे.