ओ साहेब,पाठीवर मारा पोटावर मारु नका...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:12 AM2021-06-17T04:12:52+5:302021-06-17T04:12:52+5:30
गाळेधारकांनी दिली प्रशासनाला आर्त हाक : उपोषणाचा दुसरा दिवस ; आज अर्धनग्न आंदोलन करणार लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - ...
गाळेधारकांनी दिली प्रशासनाला आर्त हाक : उपोषणाचा दुसरा दिवस ; आज अर्धनग्न आंदोलन करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - मनपा प्रशासनाने गाळेधारकांना बजाविलेल्या लाखोंच्या अवाजवी बिलांच्या व गाळेकारवाईच्या विरोधात शहरातील गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी साखळी उपोषण पुकारले आहे. बुधवारी गाळेधारकांनी उपोषणाच्या दिवशी अंगावर विविध घोषवाक्यांचे स्टीकर लावून उपोषण केले. ‘ओ साहेब पाठीवर मारा, पोटावर मारू नका’ अशी आर्त हाक देत प्रशासनाला गाळे कारवाई न करता, बिलांमध्ये सवलत देण्याची मागणी गाळेधारकांनी केली आहे.
आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांच्या नेतृत्वात सकाळी ९ ते १ वालेचा मार्केटचे दिनेश नाईक, संजय अमृतकर, रवी जाधवाणी, सुरेश कुकरेजा, हरीश थोरणी साखळी उपोषणाला बसले होते. तसेच दुपारी १ ते ६ वालेचा मार्केटचे संदीप छबडीया, प्रतीक करम चांदनी, नंदलाल बुधानी, वासुदेव गेही, हरीश शामनानी हे गाळेधारक उपोषणाला बसले होते. जोपर्यंत प्रशासन गाळेधारकांच्या मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील अशी भूमिका गाळेधारकांनी घेतली आहे. दरम्यान, गुरुवारी गाळेधारक अर्धनग्न आंदोलन करण्यात येणार आहे.
आमदार सुरेश भोळे यांनी घेतली भेट
गाळेधारकांच्या साखळी उपोषणाला दोन दिवसात विविध संघटना, संस्थांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे. शहराचे आमदार सुरेश भोळे तसेच महानगरपालिका स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे- पाटील यांनी बेमुदत साखळी उपोषणाच्या ठिकाणी भेट देऊन पाठिंबा केला. मनसेचे जिल्हा सचिव ॲड.जमील देशपांडे व जनहित कक्ष महानगराध्यक्ष संदीप मांडोळे तसेच बहुजन मुक्ती मोर्चाचे सुमित्र अहिरे, बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमजद रंगरेज, बहुजन मुक्ती पार्टी जिल्हासचिव विजय सुरवाडे, बहुजन क्रांती मोर्चाचे राजेंद्र खरे, भारत मुक्ती मोर्चाचे देवानंद निकम यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. माजी आमदार मनसेचे ॲड.जयप्रकाश बाविस्कर यांनी संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांना साखळी उपोषणाला आपला पाठिंबा दर्शविला. कॉनफिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स असोसिएशनचे प्रवीण पगारिया, संजय शहा, दिलीप गांधी, राम सूर्यवंशी, अश्विन सुरतवाला यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आपला पाठिंबा दिला.