अग्गो... सावलीचे घड्याळ पाहिले का? वेळही कळते बरे..!
By अमित महाबळ | Published: January 23, 2024 05:57 PM2024-01-23T17:57:36+5:302024-01-23T17:57:45+5:30
भूगोल सप्ताहनिमित्त शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात मराठी विज्ञान परिषद, सायन्स असोसिएशन व भूगोल विभाग यांच्या वतीने पोस्टर प्रदर्शन, सूर्यमापी व सावलीचे घड्याळ यांचे प्रदर्शन सोमवारी (दि.२२), भरविण्यात आले होते.
जळगाव : मोबाइल आणि मनगटी घड्याळ्यावरून वेळ पाहणे यात आता काहीच नावीन्य राहिलेले नाही. पण सावलीच्या घड्याळ्यावरूनही वेळ काढता येत असल्याचे पाहून विद्यार्थी हरखून गेले. २३६ विद्यार्थी, विद्यार्थिनींनी स्वतः सावलीच्या घड्याळावरून स्थानिक वेळ काढण्याचा आनंद घेतला.
भूगोल सप्ताहनिमित्त शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात मराठी विज्ञान परिषद, सायन्स असोसिएशन व भूगोल विभाग यांच्या वतीने पोस्टर प्रदर्शन, सूर्यमापी व सावलीचे घड्याळ यांचे प्रदर्शन सोमवारी (दि.२२), भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. पोस्टर प्रदर्शनात ग्रहतारे, खगोलीय घटना, वैज्ञानिकांची माहिती देण्यात आली. महाविद्यालयातील २३६ विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सावलीच्या घड्याळावरून स्वतः स्थानिक वेळ काढण्याचा आनंद घेतला. यामध्ये सर्वाधिक संख्या विद्यार्थिनींची होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. दिलीप भारंबे यांनी भूगोल दिन का साजरा केला जातो, जीवनात व अभ्यासात भूगोलाचे महत्त्व याविषयी माहिती सांगितली. सावलीच्या घड्याळाचे प्रात्यक्षिक अमोघ जोशी यांनी दाखवले. सायन्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. आर. बी. देशमुख, भूगोल विभागाचे प्रा. रामचंद्र पाटील, प्रा. राजधर पाटील, डॉ. साळवे, उपप्राचार्य डॉ. के. बी .पाटील यांचे सहकार्य लाभले.