महागाईमुळे निघतेय ‘तेल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 09:34 PM2020-11-12T21:34:09+5:302020-11-12T21:38:52+5:30
दिवाळीच्या तोंडावर होत असलेली तेल दरातील वाढ सामान्यांचे दिवाळे काढणारी आहे.
चाळीसगाव : गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली खाद्यतेलातील दरवाढ कायम आहे. दिवाळीच्या तोंडावर होत असलेली ही वाढ सामान्यांचे दिवाळे काढणारी आहे. एकीकडे अनलॉक झाल्यानंतर बाजारपेठेत उत्साह दिसून येत असतानाच दुसरीकडे मात्र चाळीसगाव शहरात आठवडाभरातच दोन तेलाच्या कंपन्यांमधील तेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे. ऐन दिवाळीच्या दिवसात झालेल्या या कारवाईने लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
पहिल्या कारवाईत शहरातील स्टेशनरोडवरील तेलाचे होलसेल वितरक मे. राजकुमार माणिकचंद अग्रवाल यांच्या दुकानातून ३ लाख ९३ हजार रुपयांचा तेलाचा साठा अन्न व औषध प्रशासन विभागाने धाड टाकून जप्त केला आहे. सोयाबीन तेलाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. हे तेल भेसळयुक्त असल्याचा या विभागाला संशय आहे. त्यानंतर सोयाड्रॉपच्या लेबलची नक्कल करून खाद्य तेलाची विक्री केली म्हणून चाळीसगावच्या नारायण ट्रेडिंग कंपनीतील मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पथकाने सुमारे पाच लाख रुपये किमतीचा तेलाचा साठा व इतर साहित्य जप्त करून सील केले आहे.
सध्या दिवाळी सणानिमित्त तेलाची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यात या दोन्ही कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिक भयभीत झाला आहे. नेमका हा काय प्रकार आहे? हा प्रश्न लोकांमध्ये सर्वत्र विचारला जात आहे. झालेला हा प्रकार मोठा गंभीर असून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे असा सूर आहे.