जळगावमध्ये जुन्या पुस्तकांचा बाजार उतरला, ग्राहकांमध्ये ५० टक्के घट

By अमित महाबळ | Published: April 10, 2023 04:11 PM2023-04-10T16:11:35+5:302023-04-10T16:12:23+5:30

शाळा सुरू झाली, की पालक आणि विद्यार्थ्यांची पावले राजकमल टॉकीज भागातील जुन्या पुस्तकांच्या बाजाराकडे वळायची.

Old book market in Jalgaon down, 50 percent drop in customers | जळगावमध्ये जुन्या पुस्तकांचा बाजार उतरला, ग्राहकांमध्ये ५० टक्के घट

जळगावमध्ये जुन्या पुस्तकांचा बाजार उतरला, ग्राहकांमध्ये ५० टक्के घट

googlenewsNext

जळगाव : ऑनलाइन खरेदीवर मिळणारी सूट, ठरावीक दुकानातून करावी लागणारी खरेदी, शाळांमध्येच मिळणारी नवीन पुस्तके या सर्वांचा परिणाम होऊन जुन्या पुस्तकांचा बाजार रोडावला आहे. ग्राहक ५० टक्क्यांनी घटले आहेत. पूर्वी दुर्मिळ पुस्तकेही विकली जायची. ती आता बंद करण्यात आली आहेत.

शाळा सुरू झाली, की पालक आणि विद्यार्थ्यांची पावले राजकमल टॉकीज भागातील जुन्या पुस्तकांच्या बाजाराकडे वळायची. कमी किमतीत शाळा, कॉलेजची पुस्तके मिळायची. ती बाइंडिंग करून वर्षभर वापरायची आणि परत पुढच्या वर्षी त्याच दुकानात नेऊन विकायची. वर्षानुवर्षे हेच चालायचे. जळगाव शहरातील अनेकांनी पदवी व पदव्युत्तर शिक्षण जुन्या पुस्तकांवर पूर्ण केले आहे. पण आता हे गणित बदलले आहे. जुनी पुस्तके खरेदी करण्यासाठी येणारे कमी झाले आहेत.

दीपक व दिनेश अग्रवाल यांचे वडील रामगोपाळ अग्रवाल यांनी १९७० मध्ये जुन्या पुस्तकांचा व्यवसाय सुरू केला. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना कमी किमतीत पुस्तके मिळायला लागली. तेव्हा लोकांच्या हातात पैसा कमी असे. त्यामुळे जुनी पुस्तके खरेदी करण्याकडे कल असायचा. तसेच विद्यार्थ्यांकडून पुस्तके घेतल्यावर ती व्यवस्थित पाहणे, खराब झालेली वा फाटलेली पुस्तके बाजूला काढणे, बाइंडिंग करणे हे शाळा सुरू होण्यापूर्वीचे कामच असायचे. जुनी असली, तरी चांगली पुस्तके विद्यार्थ्यांना मिळावित हा प्रयत्न असे. गेल्या काही वर्षांपासून या बाजाराचे चित्र बदलले आहे. ग्राहक ५० टक्क्यांनी कमी झाले आहेत. इयत्ता पहिली ते बारावी सर्व माध्यमांची आणि मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, डिप्लोमा, स्पर्धा परीक्षांची पुस्तके मिळत असली तरी ती घेणारे कमी झाले आहेत.

म्हणून दुर्मिळ पुस्तके ठेवणे बंद

पूर्वी कॉलेजच्या मुलांना कथा, कादंबऱ्या, संशोधकांना दुर्मिळ पुस्तके हवी असायची. परंतु, गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन कमी झाले आहे. बहुतेक पुस्तके ऑनलाइन मिळायला लागली. त्यामुळे अग्रवाल यांनी दुर्मिळ पुस्तक ठेवणे बंद केले.

बऱ्याच गोष्टींमुळे परिणाम

लोकांची खर्च करण्याची वाढलेली आर्थिक क्षमता, ऑनलाइन खरेदीवर मिळणारी सूट, ठरावीक दुकानातून करावी लागणारी खरेदी, शाळांमध्येच मिळणारी नवीन पुस्तके या सर्वांचा परिणाम होऊन जुन्या पुस्तकांचा बाजार रोडावला आहे.

- दीपक अग्रवाल, जुन्या पुस्तकांचे विक्रेते

 माझी पदवी जुन्या पुस्तकांवरच

गेल्या १५ वर्षांपासून मुलींसाठी जुने पुस्तके घेत आहे. याच पुस्तकांचा अभ्यास करून एक मुलगी एमसीए झाली, तर दुसरी बारावीला गेली आहे. माझी स्वत:ची पदवी जुन्या पुस्तकांवरच झाली आहे. भावाचे व माझे कुटुंब मिळून सहा मुले-मुली आहेत. त्या सर्वांसाठी जुनी पुस्तकेच घेतो.

- विजय नारखेडे, पालक
 
आमचे शिक्षण जुन्या पुस्तकांवरच झाले. अर्ध्या किमतीत पुस्तके घ्यायची, ती वर्षभर वापरायचो व पुन्हा अर्ध्या किमतीत विकायचो. आता मात्र, मुलांना वर्षातून दोन वेळेस नवीन पुस्तके घ्यावी लागतात.

- प्रदीप पाटील, पालक

Web Title: Old book market in Jalgaon down, 50 percent drop in customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव