वाघूरवरील जुना पूल अखेर जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 10:54 PM2020-07-07T22:54:35+5:302020-07-07T22:54:44+5:30
साकेगावकरांच्या राहणार स्मरणात : नव्या पुलावरुन होत आहे वाहतूक
भुसावळ : अनेक लहान-मोठे अपघात तसेच प्रचंड दळणवळणाचा साक्षीदार असलेला राष्ट्रीय महामार्गावरील साकेगावच्या वाघुर नदीवरील पूल अखेर जमीनदोस्त अर्थात इतिहासजमा झाला आहे.
नवीन पूल बांधण्यात आल्याने हा जीर्ण पूल नुकताच पाडण्यात आला. पूर्वी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर या पुलाच्या ठिकाणी १२५० फूट लांबीची फरशी बांधली होती व यावरून वाहतूक होत होती. फरशी पुलावरून पाणी गेल्यास अनेक वेळा रहदारीस अडथळा निर्माण होत होता. यानंतर येथे हा पूल बांधणीकरिता प्रथम १९५०ला कामाची प्राथमिक पाहणी पूर्व खान्देश विभाग एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर यांच्याकडून करण्यात आली होती .
१९५२ पूल बांधण्याचे अंदाजपत्रक शासनाकडे पाठविले व १९५३ ला यास मंजुरी मिळाली मंजुरी मिळाली.
असा होता पूल
पुलाची एकूण लांबी ७०५ फूट, रुंदी २६ फूट ६ इंच तर पुलावरील रस्त्याची रुंदी २४ फूट होती. नदीच्या पात्रापासून सरासरी उंची ४५ फूट होती. एकूण ७ कमानी होत्या व प्रत्येक कमानीची रुंदी ८० फूट होती. पुलाच्या कमानी लोखंडी सळया व सिमेंट काँक्रीटच्या वापर करून तयार केल्या होत्या.
सहा इंच जाडीचा सिमेंटकॉंक्रीटचा थर टाकला होता. आता हा पूल पाडण्याचे काम जवळपास पूर्णत्वास आले असून नवीन पूल बांधला गेला असला तरी हा जुना पूल साकेगावकरांसाठी स्मरणात राहील असाच होता.
या अधिकाऱ्यांनी पाहिले काम
मुंबईच्या दि उषा ट्रेडिंग कंपनीला पुलाचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले होते यासाठी चिफ इंजिनिअर म्हणून यु महिदा, डब्ल्यू एक्स मॅक्सरेन्हस, यु. जे. भट्ट, सुपरहीटेड इंजिनिअर म्हणून के. व्ही. जोगळेकर डब्ल्यू काळे, एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर एल. आहुजा, जी.एस. पडवळ, एन . कुडाळकर, वाय. रोहेकर, डेप्युटी इंजिनीयर म्हणून ढमढरे, शिंपी,घूगे पेटकर देव्हरे यांनी फुलाची डिझाइनिंग निर्मिती केली होती.