वृध्द दांपत्याच्या डोक्यात बॅट मारून लुटला लाखोंचा ऐवज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:15 AM2021-02-15T04:15:24+5:302021-02-15T04:15:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात १२ दिवसांपूर्वी सशस्त्र व धाडसी दरोडा पडलेला असतानाच पुन्हा शहरातील उपनगर असलेल्या खेडी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात १२ दिवसांपूर्वी सशस्त्र व धाडसी दरोडा पडलेला असतानाच पुन्हा शहरातील उपनगर असलेल्या खेडी येथील श्रीकृष्ण नगरात रविवारी पहाटे साडेतीन वाजता दरोडा पडला. पोलीस अंमलदाराचे वृध्द आई, वडील व १२ वर्षाच्या भाच्याला घरातीलच बॅटने बेदम मारहाण करुन कपाटातील रोख रक्कम व दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लुटून नेल्याची घटना घडली. या घरात प्रवेश करण्यापूर्वी चोरट्यांनी याच परिसरातील यमुना नगरात विजय सुखदेव चव्हाण यांच्या घरातून सुटकेस लांबविली तर गुरुदत्त नगरात योगेश भानुदास पाटील यांच्यासह आणखी एका ठिकाणी असाच प्रयत्न केला. त्याशिवाय जिनेंद्र मधुकर सैतवाल (४७, रा.राधाकृष्ण नगर) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून मुलीच्या लग्नासाठी ठेवलेले २० हजार रुपये रोख व पत्नीचे दागिने असा १ लाख ५८ हजार ६०० रुपयांचा ऐवज लांबविला.
नंदुरबार पोलीस दलात कार्यरत असलेले योगेश जगन्नाथ भोळे यांचे खेडी येथे गावाच्या बाहेर श्रीकृष्ण मंदिराजवळच दुमजली घर आहे. मोठा भाऊ विकास आर्मीमध्ये असून दोन्ही भाऊ नोकरीच्या ठिकाणी आहेत तर घरी वडील जगन्नाथ शंकर भोळे, आई सुशीलाबाई व मोठ्या भावाची पत्नी हर्षा, त्यांचा मुलगा जीवांश असे राहतात. शनिवारी सकाळी भाचा सिध्दांत अनिल दांडगे (१२) हा घरी आलेला होता. वृध्द दांपत्य व सिध्दांत एका खोलीत तर हर्षा व त्यांचा मुलगा दुसऱ्या खोलीत झोपलेले होते. पहाटे साडेतीन वाजता मागील लोखंडी गेटवरून उडी घेऊन तीन जण आतमध्ये आले. टॉमीने दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. जागे झालेल्या सुशीलाबाई यांना बॅट मारल्यानंतर पुढे आलेले त्यांची पती जगन्नाथ भोळे यांच्या डोक्यात बॅट घातली नंतर नातवाच्या खांद्यावर बॅटने हल्ला केला. कपाटातील ५० हजार रुपये रोख, मंगळसूत्र व इतर दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज लांबविला. इतर ठिकाणी शेजारच्या घरांच्या कड्या बाहेरुन बंद करण्यात आल्या होत्या. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.