बुढ्ढी के बाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 03:13 PM2019-03-03T15:13:14+5:302019-03-03T15:13:40+5:30
बुढ्ढी के बाल म्हटले की, सर्वांना लहानपण आठवते. धरणगाव येथील साहित्यिक बी.एन.चौधरी यांनी ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत याच बुढ्ढी के बाल याविषयी खुमासदार शैलीत लिहिले आहे.
‘अम्मीजान.... अम्मीजान देखो तो, अपने रहीम को सामनेवाली गलीके रामने बहोत मारा. वो, रो रहा है मैदान मे...’
सकिना दम लागल्यागत बोलत होती. तिची चिंता ऐकून तिची अम्मी फातिमाने हातातलं काम तसंच टाकत बाहेर धाव घेतली.
आपली ओढणी सावरत सकिना मैदानाकडे निघाली. तिथे तिला रहीम रडताना दिसला. त्याचे कपडे मातीने माखले होते. चेहऱ्यावर अश्रू वाहून थिजले होते. फातिमाने रहिमला बखोटीला धरुन तरातरा ओढत घराकडे आणले.
‘कितनी बार कहा तुझे, साथ मे खेलते हो... तो लडना झगडना नही. पर तुम हो के मानतेही नही.’ फातिमा त्रासिक मुद्रेने रहिमकडे पहात म्हणाली.
‘अम्मीजान, हम कहा लडझगड रहे थे. बस, थोडीसी खिंचातानी हो गई रामसे.’ हिला कोणी सांगितलं, आमचं भांडण झालंय ते? या असमंजस्याने तो अम्मीकडे पहात तिच्यासोबत फरफटला जात होता.
बघता बघता बातमी वाऱ्यासारखी मोहल्ल्यात पसरली.
रहिमचा अब्बू रागारागात त्याच्या दोनचार साथीदारांना घेऊन रामच्या घराकडे निघाला.
‘आज सबक सिखानाही पडेगा हरामके पिल्ले को.’
त्याचा त्वेष पहाता त्याच्या सोबत्यांची गर्दी वाढली.
प्रत्येकाच्या हातात लाठी, काठी, सळई, दगड, विटा काहीतरी होतेच आणि डोक्यात होता विद्वेष. क्षणात मोहल्ल्याचा माहोल बदलला.
साऱ्यांनी रामाचे घर गाठले. ‘कहा है वो हरामी? अब उसकी खैर नही. अब ना सहेंगे?’ सलीम थरथर करत होता. हा सगळा गलका ऐकत फातिमा रहिमला तसाच सोडत मोहल्ल्यात पळाली. ती सलीमचा स्वभाव जाणून होती. ती पोहचली तोपर्यंत सलीम रामच्या बाबांना भिडला होता. काही समजून घेण्यापूर्वी सलीमने केलेली अरेरावी, शिवीगाळ याने महिपतीला चेव चढला. तोही सलीमवर तुटून पडला. सोबत आलेले व गल्लीतलेही एकमेकांना भिडले. अनेकांची डोकी फुटली. झोपड्यांची नासधूस झाली. एकच कोलाहल माजला.
गर्दीतल्याच कुणीतरी फोन करून पोलिसांना बोलावले. सायरन वाजवत त्यांची गाडी आली; तसे सारे भानावर आले. त्यांनी अनेकांना ताब्यात घेतले. तशाही अवस्थेत सलीमने रामला बाहेर काढायची मागणी पोलिसांकडे केली. पोलिसांनी सारे घर धुंडाळले. घरात राम नव्हताच.
‘साहेब तो घरातच नाही.’
हेच सांगतोय मी मघापासून. माझं कुणीच ऐकत नाही. महिपती जीव तोडून सांगत होता.
पोलीस म्हणाले, ‘रहिम तरी कुठंय?’
त्याच्या अम्मीनं घराकडे बोट दाखविले. पोलीस आता त्याच्या घराकडे निघाले. त्यांच्यामागे तुफान गर्दी. हिंदू-मुस्लीम आणि सारे. रहिमही घरात नव्हता. अम्मी बाहेर गेली, ही संधी साधून त्याने बाहेर धूम ठोकली होती. ठेल्यावर बसलेल्या एका वृद्धाने मैदानाकडे बोट दाखवत तो तिकडे गेल्याचे सांगितले. सारे पुन्हा मैदानाकडे धावले. एका हाताने सायकल सांभाळत दुसºया हातातील घंटी वाजवत बोलत होता...
बुढ्ढीके बाल, बुढ्ढीके बाल,
चार आनेके बुढ्ढीके बाल.
मेल मिलाये, भेद मिटाये,
दोस्त बनाये बुढ्ढीके बाल !
-बी.एन.चौधरी, धरणगाव, जि.जळगाव