वृद्ध होती तरणे रे....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 01:25 PM2019-06-17T13:25:40+5:302019-06-17T13:26:32+5:30
‘निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, एकनाथ, नामदेव, तुकाराम’ या संतांचा जयघोष आजही अनेक शतकानंतर सर्वार्थाने केला जातो. हे खूपच वैशिष्टपूर्ण ...
‘निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, एकनाथ, नामदेव, तुकाराम’ या संतांचा जयघोष आजही अनेक शतकानंतर सर्वार्थाने केला जातो. हे खूपच वैशिष्टपूर्ण आहे. त्यातील मौलिक अर्थ असा आहे की, हे विश्वची माझे घर । ऐसी मती जयाची स्थीर । किंबहुना चराचर । आपण जाहला ।। या ज्ञानेश्वरीतील विशाल विचारांचा आदर्श घेत संत परंपरा अनेक आक्रमणे व आघात स्वीकारत आपले अस्त्तित्व अबाधित ठेवून जन प्रबोधन करीत शतकानुशतके विठ्ठल भक्तीचा संदेश देत आहे.
‘ज्ञानदेवे रचिला पाया ...... तुका झालासे कळस’ या अभंगातील संत इमारत अनेक शतकांच्या वैचारिक पातळीत खोलवर वारकरी तत्व रुजवणारी आहे. आजही विठ्ठल भक्तीचा आनंद यात्रेत अर्थात पंढरीच्या वारीत अनेक धर्म, पंथ, जाती ह्या एकरूप झालेल्या असतात. या पंढरीच्या वारीचे अनेक संतांनी वर्णन केले आहे. त्यात संत नामदेवराय सांगतात की,
पंढरीची वारी जयाचिये कुळी । त्याची पायधुळी लागो मज ।।
संत ज्ञानोबाराय म्हणतात की,
माझे जिवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ।।
आणि त्याच वारीचे वर्णन संत तुकोबाराय करतात की,
उदंड पाहिले, उदंड ऐकिले । उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ।।
ऐसी चंद्रभागा, ऐसे भिमातीर । ऐसा विटेवर देव कोठे ।।
ऐसे संत जन, ऐसे हरीदास । ऐसा नामघोष सांगा कोठो ।।
याप्रमाणे वारीचे श्रेष्ठत्व विविध संतांनी अधोरेखित केले आहे.
आता पंढरपूरकडे जाण्यासाठी वारकरी आतुर झालेले आहेत. म्हणून पंढरीची वारी आता आंतरराष्टÑीय वारी झालेली आहे. वारकरी आपले भौतिक वैभव विसरून वारीसाठी तळमळ करीत आहेत. म्हणूनच संपदा सोहळा नावडे मनाला। लागला टकळा पंढरिचा ।।
आपल्या खान्देशातून अनेक दिंड्यांची परंपरा कायम आहे. आजही अनेक दिंडी सोहळे पंढरपूरला जात असतात.
पंढरीच्या वारीचे वैशिष्ट
- ज्याला भूक लागत नाही, त्याने वारीत यावे.
- ज्याला झोप लागत नाही, त्याने वारीत यावे.
-ज्याला शारीरिक व्याधी आहे, त्याने वारीत यावे.
मंडळी आपल्या घरी अतिशय सुग्रास भोजन असूनही ज्यांना भूक लागत नाही अशी माणसं वारीत २-२ भाकरी खातात. आणि घरी झोपेची गोळी घेतल्याशिवाय झोपत नाही. अशी माणसं वारीत दिवसा विसाव्यामध्ये घोरतात. आणि विशेष म्हणजे विविध शारीरिक व्याधी, दु:ख, विसरून वारीतील लोक अक्षरश: नाचतात ! फुगड्या खेळतात, ‘वृद्ध होती तरणे रे’ याप्रमाणे वारीमध्ये कायिक, वाचिक, मानसिक तपश्चर्या घडते.
-विजय नामदेव भामरे, अध्यक्ष, सुकेश्वर देवस्थान.