कुºहे (पानाचे) येथे भरधाव डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 04:44 PM2019-12-16T16:44:22+5:302019-12-16T16:45:38+5:30
कुºहे (पानाचे) येथे प्रांतर्विधीसाठी शेताकडे जात असलेल्या प्रल्हाद तुळशीराम पाटील (भगत) (वय ६५) यांना राखीने भरलेल्या भरधाव डंपरने जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील कुºहे (पानाचे) येथे प्रांतर्विधीसाठी शेताकडे जात असलेल्या प्रल्हाद तुळशीराम पाटील (भगत) (वय ६५) यांना राखीने भरलेल्या भरधाव डंपरने जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास कुºहे (पानाचे) गावाजवळ बोदवड रस्त्यावर घडली. घटनेची माहिती समजताच गावातील शेकडो नागरिक घटनास्थळी जमा झाले.
दरम्यान, पंधरा ते वीस दिवसांपूर्वी याच रस्त्यावर अवघ्या दोनशे फूट अंतरावर डंपरने मोटारसायकलला धडक दिली होती. या रस्त्यावरून रात्रंदिवस अवैध गौण खनिज, रेती व राखेने भरलेले डंपर भरधाव वेगाने सुरूच असतात. याकडे महसूल व पोलिस प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष असल्यामुळे अवघ्या १५ दिवसातील हा दुसरा अपघात आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
डंपर क्रमांक एमएच-१९-झेड- ४४२७ हे चारचाकी वाहन बोदवड रस्त्याने राखेने भरून भरधाव वेगाने येत होते तर प्रल्हाद पाटील हे शेताकडे प्रांतर्विधीसाठी जात होते. यावेळी डंपरने साईट सोडून सरळ पाटील यांच्या अंगावर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटना घडतात डंपरचालक मयूर गंगाधर फालक (साकेगाव) स्वत:हून तालुका पोलीस स्टेशनला जमा झाला. अपघाताची चर्चा गावात पसरताच शेकडो नागरिक घटनास्थळी दाखल झाले.
पोलीस पोहोचले दीड तासाने, नागरिकांच्या संयमाचे कौतुक
यावेळी नागरिकांनी घटनेची माहिती तालुका पोलीस स्टेशन व पोलीस निरीक्षक कुंभार यांना फोनवरून कळवली. मात्र तालुका पोलीस स्टेशनचे पो.कॉ.राजेश पवार व अजय माळी हे घटनास्थळी तब्बल दीड तासानंतर दाखल झाले. मात्र सहनशील असलेल्या नागरिकांनी कोणतीही नासधूस न करता पोलिसांची येण्याची वाट पाहिली व पोलिसांना सहकार्य केले. पोलिसांनी जागेवर पंचनामा केला व मयताचे शव विच्छेदनासाठी जळगाव येथील सामान्य रुग्णालयात पाठवले.
१५ दिवसातील दुसरी घटना, अवैध गौणखनिज वाहतुकीकडे दुर्लक्ष
दरम्यान, २६ नोव्हेंबर रोजी याच रस्त्यावर या घटनास्थळापासून अवघ्या दोनशे फूट अंतरावर एका मोटारसायकलला रेतीच्या डंपरने जोरदार धडक दिली होती. ही घटना रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली होती. घटनेनंतर अज्ञात वाहन फरार होण्यात यशस्वी झाले होते. या रस्त्यावरून रात्रीही गौणखनिज, रेतीची सर्रास वाहतूक सुरू असते. महसूल व पोलीस प्रशासनाचे मात्र या अवैध गौणखनिज व वाळू वाहतुकीकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. ही वाहने भरधाव वेगाने जात असल्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.