पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्धेचे मंगळसूत्र लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:12 AM2021-06-18T04:12:44+5:302021-06-18T04:12:44+5:30
जळगाव : दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सुनीता सुरेश पाटील (वय ६०) या वृद्धेच्या गळ्यातील ३० हजार रुपये ...
जळगाव : दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सुनीता सुरेश पाटील (वय ६०) या वृद्धेच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र व सोनसाखळी तोडून पलायन केल्याची घटना बुधवारी सायंकाळी श्रीनिवास कॉलनीत घडली. याप्रकरणी गुरुवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनीता पाटील या अंगणात फिरत असताना ३५ ते ४० वर्षे वयोगटातील दोन जण दुचाकीवरून आले. त्यातील एक जण लांब अंतरावर दुचाकी घेऊन थांबला. दुसऱ्याने वृद्धेजवळ येऊन पत्ता विचारण्याचा बहाणा केला. आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून सुनीता यांच्या गळ्यातील सोनसाखळी व मंगळसूत्र तोडून पळ काढला आणि पुढे थांबलेल्या सहकाऱ्याच्या दुचाकीवर बसून कन्या शाळेच्या दिशेने निघून गेला. या घटनेनंतर महिलेने आरडाओरड केली. मात्र, काहीच उपयोग झाला नाही. गुरुवारी सकाळी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक विलास शेंडे करीत आहेत.
--