एमबीएच्या विद्यार्थ्यांना जुन्या प्रश्नपत्रिका, विद्यापीठाकडून सत्यशोधन समिती स्थापन
By अमित महाबळ | Published: June 13, 2023 11:02 AM2023-06-13T11:02:10+5:302023-06-13T11:02:42+5:30
विद्यापीठाच्या एम.बी.ए. प्रथम व द्वितीय सत्राच्या परीक्षा नुकत्याच पार पडल्या. या परीक्षेत काही विषयांच्या प्रश्नपत्रिका जुन्याच देण्यात आल्या होत्या.
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम. बी. ए. सत्र प्रथम व द्वितीयच्या परीक्षेत काही विषयाच्या जुन्याच प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. या संदर्भात कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. सतीश कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती स्थापन केली आहे.
विद्यापीठाच्या एम.बी.ए. प्रथम व द्वितीय सत्राच्या परीक्षा नुकत्याच पार पडल्या. या परीक्षेत काही विषयांच्या प्रश्नपत्रिका जुन्याच देण्यात आल्या होत्या. याबाबत काही विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठाकडे निवेदन देवून याबाबत चौकशीची मागणी केली होती. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी याची दखल घेऊन सोमवार, दि. १२ जून रोजी सत्यशोधन समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
व्यवस्थापन परिषद सदस्य तथा विद्यापीठ संगणकशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. सतीश कोल्हे हे समितीचे अध्यक्ष आहेत. ही समिती लवकरच आपला अहवाल देईल, अशी माहिती कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी दिली.