'सखे, आपण निराधार देऊया एकमेका आधार', मुडीच्या वृद्ध महिलांनी तरुणांना लाजवले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 08:57 AM2018-12-16T08:57:15+5:302018-12-16T08:59:50+5:30
म्हातारपणी निराधार जीवन जगत असताना शासनाकडून मिळणाऱ्या मोफत धान्यासाठी ऐंशी वर्षाच्या वृद्धेला अडचण आली... कुणाची मदत घेऊ ..या विवंचनेत असताना दुसरी निराधार महिला मदतीला धावून आली.
- संजय पाटील
अमळनेर(जळगाव) : म्हातारपणी निराधार जीवन जगत असताना शासनाकडून मिळणाऱ्या मोफत धान्यासाठी ऐंशी वर्षाच्या वृद्धेला अडचण आली... कुणाची मदत घेऊ ..या विवंचनेत असताना दुसरी निराधार महिला मदतीला धावून आली. दोघी निरक्षर तरी जगण्याच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे त्यांनी अडचण सोडवली. अशात एक जण त्यांच्या मदतीचा आला आणि त्याला प्रशासनाची जोड मिळाली. दोघाही आजीबाईंची समस्या एका फोनमुळे सुटली. मुडी येथील दमोताबाई बाबुराव पाटील (८५) या वृद्धेच्या पतीचे २० वर्षापूर्वी निधन झाले. मुली लग्न होऊन सासरी गेल्या. भाड्याच्या घरात राहून त्या पिवळ्या रेशन कार्डवर मिळणा-या धान्यावर जीवन जगत आहेत. मात्र मिळणारे धान्य पॉस मशीनवर ‘थम्ब’ लावल्यावरच देण्याचा निर्णय झाला. वय झाल्याने दमोताबाईंच्या बोटांच्या रेषा आधारशी जुळत नाही. यावर रेशन दुकानदाराने अमळनेर येथे जाऊन आधारकार्ड अपडेट करून आणण्याचा सल्ला दिला.
मुडीपासून २२ किमी अमळनेरला जायचे ... नगरपालिका शोधायची कशी ? ..आणि हातच्या रेषा कुठे जुळवायच्या ? असा प्रश्न त्यांना पडला. जगण्याच्या प्रबळ इच्छा त्यांना बळ देऊन गेली. त्यांच्या मदतीला तुळसाबाई नथा चौधरी (७८) या धावल्या. ‘सखे तू आणि मी निराधार एकमेका आधार देत त्या सोबतच अमळनेरला आल्या. नगरपालिका कुठे, आधार कार्ड कुठे अपडेट होणार काहीच माहिती नव्हती. अशा वेळी एका मोटरसायकलस्वाराने त्यांना तहसील कार्यालयात नेले आणि तहसीलदार प्रदीप पाटील यांना घटना सांगितली.
प्रदीप पाटील यांनी घटनेचे गांभीर्य समजून घेत तातडीने रेशन दुकानदाराला फोन लावून अशा वृद्ध व्यक्तींना हमीपत्रावर धान्य देता येते, त्यांच्या हाताच्या रेषा आधारकार्डशी जुळत नाहीत अशा व्यक्तींना त्रास देऊ नका... धान्य द्या.... म्हणून सूचना केल्या. वृद्ध महिलेची समस्या मिटली. थकलेल्या शरीरासह , तब्बल २२ किमी प्रवास करून मैत्रिणीला मदत करण्यासाठी दुसºया वृद्धेच्या जिद्दीला सलाम.