वृध्द दाम्पत्याला मारहाण; भावंडासह तिघांना कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 09:40 PM2019-11-07T21:40:57+5:302019-11-07T21:41:10+5:30
न्यायालय : पाच जण निर्दोष मुक्त
जळगाव : पाचोरा तालुक्यातील अंतुली बुद्रुक येथील प्रकाश केशव महाजन (६२) व विजया प्रकाश महाजन (५६) या वृध्द दाम्पत्याला छायाचित्र काढण्याच्या कारणावरुन लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केल्याप्रकरणात न्यायालयाने माधव चिंधा पाटील (३८), हिरामण चिंधा पाटील (४६) या दोन भावांसह राहूल धनराज पाटील (२८) या तिघांना तीन महिने सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली. न्या.पी.वाय.लाडेकर यांनी गुरुवारी हा निकाल दिला.
दरम्यान, या घटनेतील बाबुलाल गोबजी पाटील, नामदेव कैलास पाटील (२२), चिंधा गोबजी पाटील (८५), प्रशांत शिवाजी पाटील (३१) व भाऊसाहेब ओंकार पाटील (२९) यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. बाबुलाल पाटील मृत आहेत.
अंतुली येथील प्रकाश महाजन व त्यांची पत्नी विजया हे दोन्ही २७ मे २०१५ रोजी शेतात काम करत होते. यादरम्यान त्याच्या शेतात बांधावर एक ट्रॅक्टर आले. त्या ट्रॅक्टरचा महाजन यांनी छायाचित्र काढले. माधव चिंधा पाटील यांनी महाजन यांना फोटा काढू नको, फोटो काढले तर तुला ट्रॅक्टरखाली चिरडून मारुन टाकेल, अशी धमकी देत त्यांच्यासह इतरांनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. यावेळी पत्नी विजया यांनाही मारहाण करुन जखमी केले व त्याच्या गळ्यातील ११ ग्रॅमची सोन्याची साखळी ओढून नेली होती. याप्रकरणी प्रकाश महाजन यांच्या फिर्यादीवरुन पाचोरा पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. तपासधिकारी एस.आर.ब्राम्हणे यांनी तपास करुन पाचोरा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
खटला सुरु असतांना एकाचा मृत्यू
या खटल्याचे कामकाज जिल्हा न्यायालयातील न्या. पी.वाय. लाडेकर यांच्या न्यायालयात चालले. यात सरकारपक्षातर्फे मुळ फिर्यादी त्यांची पत्नी, पंच, जखमींवर उपचार करणारे डॉ. व्ही.आर.कुरकुरे, डॉ. गणेश राठोड, तपासाधिकारी एस.आर.ब्राम्हणे अशा नऊ जणांच्या साक्ष नोंदविण्यात आल्या. खटल्या दरम्यान बाबुलाल गोबजी पाटील (७८) यांचा मृत्यू झाला होता. कलम ३२३ सह ३४ नुसार तीन महिने सश्रम कारावास व प्रत्येकी पाचशे रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना कारावास, कलम ४४७ सह ३४ नुसार दोन महिने सश्रम कारावास, प्रत्येकी २०० रुपये दंड, दंड न दिल्यास १५ दिवस साधा कारावास, कलम ५०६ सह ३४ नुसार तीन महिने सश्रम कारावास प्रत्येकी पाचशे रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली. सरकारपक्षातर्फे अॅड. प्रदीप एम.महाजन, मुळ फिर्यादीतर्फे अॅड. चंद्रकांत शर्मा यांनी काम पाहिले. खटल्याकामी पैरवी अधिकारी अनिल सपकाळे, पाचोरा पोलीस स्टेशनचे केसवॉच सुर्यकांत नाईक यांनी सहकार्य केले.