जळगाव शहरात पॉलिशच्या बहाण्याने लांबविले वृध्देचे दागिने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 04:52 PM2018-05-09T16:52:22+5:302018-05-09T16:52:22+5:30
दागिने पॉलिश करुन देण्याच्या बहाण्याने दोन्ही भामट्यांनी इंदूबाई गोविंद चौधरी (वय ६०) या वृध्देच्या हातातील ८५ हजार रुपये किमतीच्या ३९ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या लांबविल्याची घटना बुधवारी सकाळी दहा वाजता मुक्ताईनगरातील एसएमआयटी महाविद्यालय परिसरात घडली. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,९ : दागिने पॉलिश करुन देण्याच्या बहाण्याने दोन्ही भामट्यांनी इंदूबाई गोविंद चौधरी (वय ६०) या वृध्देच्या हातातील ८५ हजार रुपये किमतीच्या ३९ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या लांबविल्याची घटना बुधवारी सकाळी दहा वाजता मुक्ताईनगरातील एसएमआयटी महाविद्यालय परिसरात घडली. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, इंदूबाई चौधरी बुधवारी घरी असताना सेल्समनसारखे दोन जण आले. आमच्याकडे पितळी भांडी पॉलिश करुन देण्याची पावडर असून अतिशय चांगल्या प्रकारे भांडी स्वच्छ होतात असे सांगून इंदूबाई यांना घरातील भांडी स्वच्छ करण्यासाठी गळ घातली. त्यामुळे त्यांनी देवघरातील गणपती व इतर देव आणले, ते त्यांनी स्वच्छ करुन दाखविले. त्यानंतर घरातील तांब्या व इतर पितळी भांडी स्वच्छ करुन दाखविले असता सोन्याचे दागिने देखील आम्ही पॉलिश करुन देतो असे सांगून हातातील सोन्याच्या चारही बांगड्या काढायला लावल्या. या बांगड्या तांब्यात टाकून त्यात शॅम्पूसारखे केमिकल्स व हळद आदी साहित्य टाकले. त्यानंतर नजर चुकवून काही क्षणातच बांगड्या घेऊन पोबारा केला.
दुचाकीवरुन गेले भरधाव वेगाने
घरी आलेल्या अनिल चौधरी यांनी गल्लीत असलेल्या तरुणांना विचारले असता एक जण दुचाकीवर होता तर दुसरा घरातून पायी चालत आला व नंतर एकाच दुचाकीवरुन दोघं जण भरधाव वेगाने निघून गेल्याचे सांगितले. परिसरात दोघांचा शोध घेतला, मात्र उपयोग झाला नाही.त्यामुळे अनिल चौधरी यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. दरम्यान, घटना घडली तेव्हा इंदूबाई व त्यांचे पती असे दोघंच घरी होते. सून भारती चौधरी या गावाला गेलेल्या होत्या.