कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांमध्ये वृध्दांचेच प्रमाण अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 12:13 PM2020-05-13T12:13:57+5:302020-05-13T12:14:33+5:30
दीड महिन्यात रुग्णालयात ३०पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू : १० महिन्याचे बाळ व ९८ वर्षीय महिलेचाही मृतांमध्ये समावेश
जळगाव : कोरोना बाधीत व कोरोना संशयित असलेल्या ३० च्यावर रुग्णांचा दीड महिन्यात मृत्यू झालेला असून सर्वसाधारण ५५ ते ८० या वयोगटातील वृध्दांचीच अधिक संख्या आहे. त्याशिवाय १० महिन्याच्या एका बाळाचा, ९८ वर्षीय महिला व ९० वर्षीय पुरुषाचाही समावेश आहे. कोरोना बाधीत असले तरी दोन रुग्ण वगळता सर्वांना मधुमेह, हृदयविकार, कोणाला किडनी आजार, कर्करोग अशा विविध प्रकारच्या व्याधी होत्या, असेही आता स्पष्ट झालेले आहे.
कोरोना बाधित मृतांची संख्या २५ असून यात केवळ एक ४० वर्षीय इसम आणि एक ४३ वर्षीय इसम आहे. उर्वरित सर्व ५५ वर्षे वयापेक्षा अधिक आहेत.
पाचोरा आणि अमळनेर येथील दोघांना कोणत्याही व्याधी नव्हत्या. कोरोना बाधीत असलेल्या तिघांचा मृत्यू रुग्णालयात आणण्यापूर्वीच झाला आहे. तसेच सात संशयितांचाही मृत्यू रुग्णालयात आणण्याआधीच झाला होता. एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींचा आकडा हा ३० च्यावर व ३५ च्या आत आहे. कोरोना बाधित मृत्यूचा आकडा २५ इतका आहे. १० महिने, ४० व ४३ वर्षाचे तीन रुग्ण सोडले तर सर्वच मृत्यू झालेल्यांचे वय हे ५५ व त्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे रुग्णांच्या मृत्यूमध्ये वृध्दांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.
रोगप्रतिकार शक्ती घटल्याने धोका
५५ व त्यापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांमध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी असल्याचे हे एक प्रमुख कारण आहे. आजाराशी लढताना मानसिकदृष्ट्या न खचणारे वृध्दही आजारावर मात करीत आहेत. मेहरुणमधील ४८ वर्षीय प्रौढ व मुंगसे, ता.अमळनेर येथील ६० वर्षीय महिला वृध्दा हे त्याचे उदाहरण आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फळे, मोसंबी, संत्र्याचा ज्यूस, हिरव्या भाज्या, निंबू, कैरी आदींचा आहारात समावेश असावा, त्याशिवाय दर तासांनी थोडं कोमट पाणी घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
जन्म-मृत्यू नोंदणी विभागात नोंदणीच नाही
मनपा जन्म-मृत्यू विभागाचे काम सध्या अतिशय संथगतीने सुरू आहे. या विभागातील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनासाठीच्या उपाययोजनांचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दरम्यान, लॉकडाउन झाल्यानंतर या विभागात शहरातील झालेल्या एकाही मृत्यूची नोंदणी झालेली नाही. ही नोंदणी केवळ स्मशानभूमीत होत आहे. लॉकडाउन काळात ४०७ जणांचा मृत्यू झाला आहे. एप्रिल महिन्यात ३५९ मृत्यू झाले आहेत. तर मे महिन्यात २७ मृत्यू झाले आहेत. तर २५ मार्च ते ३१ मार्च दरम्यान २१ जणांचा मृत्यू झाला होता.