घराबाहेर न पडणारे वृद्धही ठरताहेत कोरोनाचे बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:12 AM2021-04-03T04:12:56+5:302021-04-03T04:12:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कधीच घराबाहेर न पडलेल्या ज्येष्ठांना किंवा महिलांनाही कोरोनाची लागण होत असल्याची अनेक उदाहरणे आता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कधीच घराबाहेर न पडलेल्या ज्येष्ठांना किंवा महिलांनाही कोरोनाची लागण होत असल्याची अनेक उदाहरणे आता समोर येत आहे. वृद्धांची प्रतिकारक्षमता आधीच कमी असल्याने त्यांना याच्या घातक परिणामांना सामोरे जावे लागते. अशा वेळी घराबाहेर जाणाऱ्या व्यक्तीने आपण घरात कोरोना तर घेऊन जात नाही ना, असा विचार करून योग्य ती खबरदारी घेतल्यानेच घरातील ही मंडळी सुरक्षित राहू शकते, असा सल्ला काही डॉक्टरांनी दिला आहे.
फेब्रुवारीपासून आलेल्या दुसऱ्या लाटेत सर्वच वयोगटांना कोरोनाची लागण होत आहे. यातही प्रामुख्याने वृद्धांचा मृत्युदर अधिक आहे. शिवाय, कुटुंबेच्या कुटुंबे बाधित होण्याचे प्रमाणही वाढले आहे. यात अनेक जण जे कधीच घराबाहेर पडलेले नाही, त्यांनाही कोरोनाची लागण होत आहे.
ही आहेत काही प्रमुख कारणे...
१) ज्येष्ठ नागरिक अनेक वेळा घराबाहेर पडत नाही. मात्र, नोकरी, व्यवसायानिमित्ताने घराबाहेर पडणाऱ्यांनी पुरेसे नियम न पाळल्याने घरातील मंडळींना कोरोनाची बाधा होत आहे.
२) अनेक वेळा ज्येष्ठ नागरिकही परिसरात वावरताना, आपल्या सहका-यांसोबत कट्ट्यावर बसताना मास्कचा वापर करीत नाही. परिसरात कशाला मास्क वापरावा, अशा गैरसमजात राहतात. यातूनही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो.
३) आता उन्हाळ्यात कुरडया, पापड करण्यासाठी महिलावर्ग एकत्रित येईल. मात्र, यातही श्रमाचे काम असल्याने काय मास्क वापरायचे, असा समजही घातक ठरू शकतो.
डॉक्टरांनी सांगितलेले पाच नियम पाळा व कुटुंबाला सुरक्षित ठेवा
१. घराबाहेर पडणाऱ्यांनी बाहेर मास्क वापरणे, हात स्वच्छ ठेवणे, गर्दी टाळणे हे नियम पाळावेत.
२. घरी आल्यानंतर आधी बाहेरील साहित्य, कपडे कुटुंबीयांपासून व त्यांच्या कपड्यांपासून लांब ठेवावेत.
३. सर्वात आधी हातपाय स्वच्छ धुवावे. त्यानंतरच घरातील कुठल्याही साहित्याला स्पर्श करावा.
४. थोडीही लक्षणे जाणवल्यास विलग होऊन तातडीने तपासणी करून घ्यावी.
५. घरातील कुणालाही लक्षणे जाणवल्यास तर्क न लढविता थेट तपासणी करून घ्यावी. हे खाल्ले म्हणून झाले, हे तर बाहेरच गेले नाही, मग कसा होईल कोरोना, असे कुठलेच गैरसमज न बाळगता तपासणी करून निदान करून घेणे कधीही उत्तम.
कोट
घराबाहेर न पडलेल्या अनेक ज्येष्ठांना कोरोनाची लागण होत असल्याची अनेक उदाहरणे नियमित तपासणीत समोर येतात. याला कारणीभूत घराबाहेर जाणारी मंडळी पुरेशी काळजी घेत नाही. त्यामुळे बाहेर जाणाऱ्यांनी बाहेर व बाहेरून घरात आल्यानंतर स्वच्छतेचे नियम पाळावेत. साहित्य व कपडे विलग ठेवावेत. हातपाय स्वच्छ धुऊनच घरात कुठल्याही वस्तूला स्पर्श करावा. लक्षणे जाणवल्यास टेस्ट करून घ्यावी.
- डॉ. संजय पाटील, वैद्यकीय अधिकारी, मनपा