पुन्हा एकदा साम, दाम, दंड, भेदाची मात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 04:42 PM2018-07-16T16:42:25+5:302018-07-16T16:44:49+5:30

पालघर पोटनिवडणुकीत ‘साम, दाम, दंड, भेद’ नीती खूप गाजली. त्यामुळे आता भाजपाने सावध पवित्रा घेत गुप्तरीतीने या नीतीचा अवलंब करीत घाऊक प्रमाणात पक्षांतरे घडवून आणल्याची टीका आता होऊ लागली आहे.

Once again, prices, prices, penalties, amount of impurities | पुन्हा एकदा साम, दाम, दंड, भेदाची मात्रा

पुन्हा एकदा साम, दाम, दंड, भेदाची मात्रा

Next
ठळक मुद्देमहापालिका निवडणुकीत सुरेशदादांची संयत भूमिकाजळगाव महापालिकेसाठी युतीनाट्याचे रहस्य गडदमहापालिका निवडणुकीत भाजपा राहणार लक्ष्य

मिलींद कुलकर्णी
पालघर पोटनिवडणुकीत ‘साम, दाम, दंड, भेद’ नीती खूप गाजली. त्यामुळे आता भाजपाने सावध पवित्रा घेत गुप्तरीतीने या नीतीचा अवलंब करीत घाऊक प्रमाणात पक्षांतरे घडवून आणल्याची टीका आता होऊ लागली आहे.
जळगाव महापालिकेची निवडणूक अपेक्षेप्रमाणे रंगू लागली आहे. तीन महिन्यांपासून भाजपा-शिवसेना युतीची चाललेली चर्चा अखेर चर्चाच राहिली. भाजपा आणि शिवसेना स्वबळावर मैदानात उतरले. युतीचे नाट्य रंगले, त्यात सुरेशदादा जैन यांची भूमिका स्पष्ट आणि रोखठोक राहिली तर भाजपाचे नेते वेगवेगळ्या भूमिका मांडत राहिले. त्यात राष्टÑवादी, खाविआ, मनसे, शिवसेना कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे भाजपाच्या ‘मिशन फिफ्टी प्लस’च्या तयारीविषयी शंका उपस्थित झाली. भाजपाची विश्वासार्हता, पारदर्शकता, कार्यकर्तृत्व याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात विरोधकांना पहिल्या टप्प्यात यश आले आहे.
शिवसेनेने युतीनाट्यावर एक चित्रफीत तयार करून शिवसेनेची भूमिका आणि भाजपाला खलनायकाच्या रूपात दर्शविले आहे; तर राष्टÑवादीचे नेते अजित पवार यांच्या विधिमंडळातील भाषणाची चित्रफीत प्रसारमाध्यमांमध्ये फिरत आहेत. त्यात ‘आयाराम-गयारामा’वरून मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीकास्त्र सोडलेले आहे. आयाराम हे कोणाचेच नाही; उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे आहेत, असे सांगून ‘आयाराम’ आणि भाजपाच्या भूमिकेचा पुरता पर्दाफाश केला आहे.
इतरांपेक्षा वेगळा, स्वच्छ व चारित्र्यवान लोकांचा पक्ष अशी बिरुदावली मिरविणाऱ्या भाजपाच्यादृष्टीने गेला आठवडा तापदायक ठरला. महापालिकेतील सत्ता मिळविण्यासाठी ‘साम, दाम, दंड, भेद’ या नीतीचा वापर होत असल्याचा आरोप राष्टÑवादीच्या नेत्यांनी केला आहे. हा आरोप राजकीय मानला तरी ‘आयारामां’मुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना पसरली आहे. प्रवीण कुळकर्णी, जयश्री नितीन पाटील, महानगराध्यक्षा जयश्री पाटील यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. महानगराध्यक्षांना निलंबित करून नाराजांना धाक दाखविण्याचा आणि बंड शमविण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत आहे, त्यात कितपत यश येते हे नजीकच्या काळात दिसून येईल.
युतीनाट्याचे रहस्य गडद
भाजपा-शिवसेना युतीच्या चर्चेची सुरुवात सुरेशदादा जैन यांनी केली. तीन महिन्यांपूर्वी बुलडाणा येथे एका कार्यक्रमात सुरेशदादा हे मुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात बोलले. युतीविषयी मुख्यमंत्री सकारात्मक होते. तुम्ही आणि गिरीश महाजन हे मुंबईला या, आपण सविस्तर ठरवूया, असे त्या वेळी निश्चित झाले. बºयाच कालावधीनंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. जळगावच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारचे सहकार्य हवे आहे; भाजपा तेथे सत्तेत असल्याने युती करावी अशी भूमिका सुरेशदादा जैन यांनी जाहीरपणे मांडली. एकीकडे वर्षभरापासून भाजपाकडून ‘मिशन फिफ्टी प्लस’ ही महापालिका निवडणुकीची तयारी सुरू होती. पण सुरेशदादा जैन, खान्देश विकास आघाडी, शिवसेना हे शत्रू आहे, असा मानणारा एक गट भाजपामध्ये सक्रिय आहे. राज्यात ज्या प्रमाणे ‘मोठा भाऊ-लहान भाऊ’ ही युतीतली भूमिका बदलली गेली; त्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न सुरू झाला. पक्षश्रेष्ठींचे या घडामोडीवर बारकाईने लक्ष होते. प्रत्येक नेता आणि पदाधिकाºयाच्या भूमिका निश्चित करून हे नाट्य पद्धतशीरपणे वठविण्यात आले. महाजन यांनी शेवटपर्यंत सुरेशदादा जैन यांच्याशी ‘युती’चा राग आळवत राहायचा; पण प्रत्यक्ष जागावाटपावर चर्चा करायची नाही. केंद्र, राज्यात भाजपा सत्तेत असताना जळगावात स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी भूमिका एकनाथराव खडसे यांनी घ्यावी. वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली आहे; पण जळगावात अद्याप बैठक नाही, असे म्हणत आमदार सुरेश भोळे यांनी कानावर हात ठेवायचे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाविषयी एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन यांनी निर्णय घ्यावा, असे सांगत केवळ प्रचार कार्य करायचे. उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाल्यानंतर इतर पक्षातील मातब्बरांना प्रवेश द्यायचा हा या नाट्याचा दुसरा अंक होता. हे सगळे व्यवस्थित झाले खरे; पण विरोधकांना बेसावध ठेवण्याची खेळी भाजपाला जमली नाही. प्रतिस्पर्धी राजकारणातील मुरब्बी असल्याने आणि भाजपाची मित्रपक्षांविषयी असलेली ‘कीर्ती’ पाहता विरोधकांनी पुरती तयार करून ठेवली होती, म्हणून शिवसेना ७१ तर काँग्रेस-राष्टÑवादी-सपा आघाडी ६७ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्यात यशस्वी ठरले.
सुरेशदादांची संयत भूमिका
महापौर ललित कोल्हे, सदाशिवराव ढेकळे या दिग्गज नेत्यांना भाजपामध्ये प्रवेश दिल्यानंतर सुरेशदादा जैन हे संतापतील आणि युती तोडण्याची घोषणा करतील, हा भाजपा श्रेष्ठींचा होरा चुकला. सुरेशदादा जैन यांनी पक्षांतर, स्वबळ हे खुलेपणाने स्वीकारले, आता योग्य कोण हे जनताच ठरवेल, अशी भूमिका घेतली. याउलट मुख्यमंत्री, जलसंपदामंत्री, पालकमंत्री, खडसे आणि आमदार भोळे, पटेल हे कोणीही युती का झाली नाही, याविषयी चकार शब्द बोलायला तयार नाहीत.
निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भाजपाची व्यूहरचना यशापयशाच्या गर्तेत सापडली असताना पुढे काय रणनीती आखली जाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
भाजपा राहणार लक्ष्य
शिवसेना आणि काँग्रेस आघाडी या दोन्ही पक्षांकडून भाजपाच आता लक्ष्य राहील, हे उघड आहे. जळगाव शहराच्या विकासाचा मुद्दा मागे पडून राष्टÑीय व राज्य स्तरावरील मुद्यांवर लक्ष्य केंद्रित करण्यावर दोन्ही पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्यांचा भर राहील, असे एकंदरीत चित्र आहे. मोदी, नोटाबंदी, जीएसटी हे मुद्दे महत्त्वाचे बनतील. भाजपाचे प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक यांनी स्वत: बैठक घेऊन परिस्थितीचा अंदाज घेतला आहे. त्यानंतर पक्षश्रेष्ठी काय रणनीती आखतात, हे पुढील काही दिवसांत कळेल.

संसद से गाव तक आणि शतप्रतिशत हे स्वप्न घेऊन भाजपाकडून प्रत्येक निवडणूक त्वेषाने लढविली जात आहे. कसेही करून यश मिळवायचे हा निर्धार पिंपरी-चिंचवड आणि नाशिक महापालिका निवडणुकीत यशस्वी ठरला. पण नांदेड आणि नंदुरबारात गडाची वीट हलली नाही. यातून बोध न घेतलेल्या भाजपाला जनसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करता आलेल्या नाहीत. मध्यमवर्गीय, व्यापारी, उद्योजक हा घटक भाजपाचा हक्काचा मतदार असला तरी नोटबंदी, प्लॅस्टिकबंदी, जीएसटीने तो वैतागला आहे. दुसरीकडे पक्षात परका आणि निष्ठावंत अशी दरी रुंदावत आहे. कार्यालयातून पक्ष बाहेर पडून श्रीमंतांच्या बंगल्यावर पोहोचला आहे. सामान्य कार्यकर्ता आहे तसाच राहिला आहे.

भाजपा-शिवसेना युतीचा प्रस्ताव दिल्यानंतर भाजपाने त्यावर खुल्यादिलाने चर्चा करणे अपेक्षित असताना वेळकाढू भूमिका घेण्यात आली. कधी खडसे यांनी विरोधाचा सूर आळवला तर कधी आमदार भोळे यांनी विश्वासात घेतले नसल्याची भूमिका मांडली. युती करायची नाही, अशी स्पष्ट भूमिका घेण्याची हिंमत कोणत्याही नेत्याने न दाखविण्याचे कारण म्हणजे खापर आपल्या डोक्यावर फुटू नये, हेच आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते खडसेंवर फुटले होते.

एका म्यानात...
आमदार सुरेश भोळे यांचा विधानसभा मतदारसंघ हा जळगाव शहर आहे. पुढील निवडणुकीची रंगीत तालीम महापालिका निवडणुकीत ते करीत आहेत. महानगराध्यक्ष या नात्याने त्यांना पक्षाने निवडणूक प्रमुख केलेले आहे. परंतु गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने ललित कोल्हे आणि कैलास सोनवणे हे भाजपामध्ये आल्याने भोळे यांना आव्हान निर्माण झाले आहे. एका म्यानात तीन तलवारी कशा राहणार अशी उत्सुकता आहे.

Web Title: Once again, prices, prices, penalties, amount of impurities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.