हरियाणातील कंपनीकडून साडेचार कोटींचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 10:52 PM2019-10-07T22:52:43+5:302019-10-07T22:52:50+5:30
हिसार या कंपनीच्या नावाखाली जिल्ह्यातील १० व साखळीतील १३० अशा एकूण १४० जणांना ४ कोटी २९ लाख ६० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला
जळगाव : सौंदर्य प्रसाधने, औषधी व इतर दोन लाखाचे उत्पादने तसेच कंपनीच्या टर्न ओव्हरवर दरमहा सात हजार किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम देण्याचे आमिष दाखवून हरियाणातील फ्युचर मेकर लाईफ केअर प्रा.लि.हिसार या कंपनीच्या नावाखाली जिल्ह्यातील १० व साखळीतील १३० अशा एकूण १४० जणांना ४ कोटी २९ लाख ६० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला असून सोमवारी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
शिवाजी नगरातील श्री मोटर्स येथे व्यवस्थापक असलेले प्रशांत छगन पाटील (४०, रा.बळीराम पेठ) यांची २९ लाख ६० हजार रुपयात फसवणूक झाली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हरियाणातील राधेश्याम नाथुराम सुतार (रा.सिस्वाल, ता.आदमपुर जि.हिसार), बन्सीलाल सिहाब (रा.तिबी, ता.भुना, जि. फतेहबाद), सुंदरसिंग सैनी (रा.फतेहबाद) तसेच प्रवीण केशव कदम (रा.निंबुडा, पा.दाभाडी, ता.सटाणा, जि.नाशिक ह.मु.नाशिक) व रवींद्र खैरनार (रा.सातपुर, नाशिक) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
विनोद निळकंठ पाटील, स्वाती रमेश जाधव (चोपडा) यांचीही यात फसवणूक झाली असून आता ही कंपनी बंद झाल्याचे सांगितले जात आहे.कविता सुनील चौधरी, दगडू गेंदा सोनवणे (रा.खेडी, ता.चोपडा), सुरेखा राजेंद्र पवार (रा.व्यंकटेश नगर, जळगाव), नितीन सुभाष मोरे (रा.बेटावद, ता.शिंदखेडा), भगवान गोकुळ पाटील (रा.नाशिक), चंपालाल हिरालाल पटेल (रा.भरवाडे, ता.शिरपुर), उध्दव पाटील (रा.पुसनद, ता.शहादा) व शोभा प्रफुल्ल राणे (रा.महाबळ, जळगाव) यांनी तयार केलेल्या साखळीतील लोकांची २ कोटी रुपयात फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.