हिवरा नदीत बुडताना एकास खडकदेवळ्याच्या तरुणांनी वाचविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 10:00 PM2020-07-17T22:00:00+5:302020-07-17T22:00:34+5:30
पाण्याचा प्रवाह : फरशी पुलावर घसरली मोटरसायकल
खडकदेवळा, ता. पाचोरा : हिवरा मध्यम प्रकल्पाच्या उगमस्थानी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने हिवरा नदीवरील फरशी पुलावर पाणी आले असून दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. याच फरशी पुलावरून पाचोरा तालुक्यातील डोंगरगाव येथील दोन युवक मोटरसायकल घेऊन जात असताना अचानक त्यांची मोटरसायकल घसरली असता बापू नारायण साळवे हा युवक पाण्यात वाहून जात असताना खडकदेवळा येथील युवकांनी त्वरित धाव घेऊन सदर युवकास पाण्यात उडी मारून वाचविले.
या घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर बघ्याची गर्दी उसळली होती. सदर युवकाला वाचविण्यासाठी भैय्या साठे, प्रवीण निकम, वैभव मगर, योगेश शिपी, बारकू दिलीप तडवी या युवकांनी पाण्यात उडी घेतली होती. १६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. हे दोघे युवक मोटरसायकलवर पाचोरा येथून बटाट्याची गोणी घेऊन जात असताना पाण्याच्या प्रवाहामुळे ही घटना घडली.
यात बापू नारायण साळवे हा युवक पाण्यात पडला होता. तर दुसरा विलास बाविस्कर हा युवकाने फरशी पुलाच्या दगडाला धरल्यामुळे वाचला.