बालिकेवर अत्याचार एकास चार वर्ष सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 11:56 AM2019-12-28T11:56:30+5:302019-12-28T11:57:05+5:30
आव्हाणी येथील घटना
जळगाव :नऊ वर्षाच्या बालिकेसोबत अत्याचार केल्याप्रकरणात नरेंद्र मुरलीधर पाटील (३०, रा.आव्हाणी, ता.धरणगाव) याला चार वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा सत्र न्यायाधीश आर.जे कटारिया यांनी शुक्रवारी हा निकाल दिला.
याबाबत माहिती अशी की, ३० जुलै २०१६ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पीडित बालिका घरात एकटी असताना नरेंद्र पाटील याने तिच्या घरात जावून अत्याचार केले. या प्रकरणी पिडीतेच्या आईने पाळधी दूरक्षेत्र अंतर्गत धरणगाव पोलीस स्टेशनला १ आॅगस्ट २०१६ रोजी तक्रार दिली होती. त्यानुसार ३५४ ब, ४५२ व लैगिंक हिंसाचारापासून बालकांचे संरक्षण कायदा कलम ७ व ११ (१) अन्वये संशयिताविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. तपास सहायक पोेलीस निरीक्षक पी.के. सदगीर यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.
सहा साक्षीदारांची तपासणी
सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पीडित , पिडितेची आई, दीपक बाबुराव पाटील, डॉ. विकास प्रल्हाद पाटील, डॉ. शेख असिफ इकबाल व तपासी अंमलदार पी.के. सदगीर तर संशयितातर्फे बचावाचे साक्षीदार तपासण्यात आले. या खटल्यात पीडित मुलीची साक्ष महत्वपूर्ण ठरली. समोर आलेल्या साक्षीपुराव्याअंती न्यायालयाने नरेंद्र पाटील याला दोषी धरून कलम ३५४ ब, ४५२ खाली प्रत्येकी एक वर्ष व प्रत्येकी ५०० रुपये दंड तर लैंगिक हिंसाचारापासून बालकांचे संरक्षण कायदा कलम ७ खाली ४ वर्ष सक्तमजूरीची व १ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सरकारकडून जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी कामकाज पाहिले. याकामी पैरवी अधिकारी सहायक फौजदार शालीग्राम पाटील यांनी मदत केली.