शंभर कोटींचे काम, तीन वर्ष झाले तरीही मनपा म्हणते थांब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:22 AM2021-08-17T04:22:08+5:302021-08-17T04:22:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अजय पाटील जळगाव : मनपाला नगरोथ्थान अंतर्गत तीन वर्षापूर्वी मिळालेल्या १०० कोटी रुपयांचा निधीतून अद्यापही दमडीच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अजय पाटील
जळगाव : मनपाला नगरोथ्थान अंतर्गत तीन वर्षापूर्वी मिळालेल्या १०० कोटी रुपयांचा निधीतून अद्यापही दमडीच्या कामाला देखील अद्याप सुरुवात झालेली नाही. वर्षभरात शहराचा चेहरा-मोहरा बदलविणाऱ्या तत्कालीन सत्ताधारी असो, वा बंडखोरांच्या सहाय्याने महापालिकेत सत्तांतर करून सत्तेत आलेले विद्यमान सत्ताधारी असोत, दोन्हीही सत्ताधाऱ्यांकडून शहराचा विकासाला गती देणाऱ्या या निधीच्या पाठपुराव्यात पुर्णपणे अपयश आले आहे. मनपातील पदाधिकाऱ्यांचा हेवेदाव्यामुळे शहरातील नागरिकांना मुलभुत सुविधांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
१६ ऑगस्ट २०१८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरोथ्थान अंतर्गत शहरासाठी १०० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता. महापालिकेत सत्ता आल्यानंतर महिनाभरातच शासनाकडून १०० कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. या निधीतून रस्त्यांचे काम मार्गी लागेल अशी अपेक्षा होती. मात्र, निधी मंजूर होवून तब्बल तीन वर्ष झाल्यावर देखील या निधीतून एक रुपयांच्याही कामाला सुरुवात झालेली नाही.
१०० कोटींचा असा प्रवास
- १६ ऑगस्ट २०१८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा
- तब्बल सहा महिने या निधीतून होणाऱ्या कामांचे नियोजन नाही.
- फेब्रुवारी २०१९ मध्ये १०० कोटीतून होणाऱ्या कामांचे केले नियोजन
- ८ ऑगस्ट २०१९ मध्ये शासनाने १०० पैकी ४२ कोटींच्या कामांना दिली मंजूरी
- ५८ कोटींचे नवीन प्रस्ताव पाठविण्याचा दिल्या सूचना
-सप्टेंबर २०१९ मध्ये ४२ कोटीतून निविदांना मंजुरी
- ४ डिसेंबर २०१९ मध्ये विद्यमान राज्य शासनाने १०० कोटींच्या निधीच्या खर्चावर आणली स्थगिती
- २७ एप्रिल २०२० मध्ये ४२ कोटींच्या कामावरील स्थगिती उठली
- ४ मे २०२० मध्ये पुन्हा स्थगिती
- १३ जानेवारी २०२१ रोजी ४२ कोटींच्या कामांना राज्य शासनाकडून ग्रीन सिग्नल
- २७ जानेवारी २०२१ राज्य शासनाच्या नगरविकास मंत्रालयाने पुन्हा आणली स्थगिती
- १२ मे २०२१ रोजी ४२ कोटींमधील कामे रद्द करून, पुर्ण १०० कोटींच्या निधीतून रस्त्यांची कामे करण्याचा मनपात ठराव
- जुलै २०२१ मध्ये ४२ कोटींचे कामे रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात भाजपकडून न्यायालयात याचिका
सत्ताधारी कोणीही असो, निधी खर्च करण्यात ठरले अपयशी
१. महापालिकेला शासनाकडून निधी मंजुर झाल्यानंतर तो निधी खर्च करण्यात भाजप व शिवसेना अपयशी ठरले आहेत.
२. २५ कोटींचा निधी २०१६ मध्ये मंजुर होवून देखील हा निधी खर्च तब्बल चार वर्षात खर्च करण्यात आला. तसेच त्यातील ३ कोटी अद्यापही खर्च करण्यात आलेले नाही.
३. १०० कोटींचा निधी मंजूर होवून ३ वर्ष झाल्यावर देखील मनपातील पदाधिकाऱ्यांच्या हेवेदाव्यात निधी खर्चात अपयश आले आहे.
प्रशासन, पदाधिकारी दोषी, नुकसान मात्र जनतेचे
तब्बल पाच वर्षांपासून शहरातील खराब झालेल्या रस्त्यांवरून नागरिक दररोज जीवघेणी कसरत करत आहेत. निधीचे नियोजन करण्यात पदाधिकारी व मनपा प्रशासनातील अधिकारी दोषी असले तरी यामुळे जळगावकरांचे मात्र नुकसान होत आहे. रस्त्यांची कामे होत नसल्याने जळगावकर अक्षरश त्रस्त झाले आहेत.