शंभर टक्के अभ्यासक्रम पूर्ण ; सराव परीक्षांना होणार सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:16 AM2021-01-03T04:16:54+5:302021-01-03T04:16:54+5:30
जळगाव : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तारीख गुरूवारी जाहीर झाली असून ४ मे पासून परीक्षा ...
जळगाव : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तारीख गुरूवारी जाहीर झाली असून ४ मे पासून परीक्षा प्रारंभ होणार आहेत. त्या अनुषंगाने शहरातील बहुतांश सीबीएसई शाळांमध्ये डिसेंबर महिन्यातच दहावी व बारावीचे अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झाले आहे. तर बोटावर मोजण्या इतक्याच शाळांचे अभ्यासक्रम पूर्ण झालेले नाहीत.
सीबीएसई दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षा ४ मे पासून सुरू होऊन १० जूनपर्यंत चालतील़ त्याचबरोबर १ मार्चपासून प्रॅक्टीकल परीक्षाही प्रारंभ होणार आहेत. मात्र, जळगाव शहरातील सात ते आठ सीबीएसई शाळांपैकी पाच ते सहा शाळांनी बारावीचा नोव्हेंबर तर दहावीचा डिसेंबर महिन्यातच अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. आता सराव चाचणी परीक्षांचे आयोजन केले असून ते पूर्णत: ऑफलाईन पध्दतीने घेतले जाणार आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्याला एखादा विषय कठीण जात असेल तर त्याचा अभ्यास पुन्हा परीक्षा सुरू होण्याच्या आधी करून घेतला जाणार असल्याचे सीबीएसई शाळांच्या प्राचार्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
- प्रतिक्रिया
यंदा ७० टक्केच अभ्यासक्रम होता, तो पूर्ण शिकवून झाला आहे़ आता सराव परीक्षा घेण्यात येणार आहेत. २८ जानेवारीपासून या सराव परीक्षांना सुरूवात होईल. सराव परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास सोयीस्कर जाईल. तसेच विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी समजून त्या सोडविण्यात येणार आहे.
-गोकुळ महाजन, प्राचार्य, पोदार सीबीएसई इंटरनॅशनल स्कूल
--------------
संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे. शाळेत शनिवारपासून सराव चाचणी परीक्षांना सुरूवात होईल़ मे महिन्यात परीक्षा असल्यामुळे चार महिन्याचा कालावधी मिळाला आहे़ त्यात सात ते आठ वेळा चाचणी परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचा अभ्यास करून घेतला जाईल.
- सुषमा कंची, प्राचार्या, ओरियन सीबीएसई स्कूल
----------------
अजून पाच ते दहा टक्के अभ्यासक्रम बाकी आहे़ तो जानेवारीपर्यंत पूर्ण केला जाईल. काही विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणावेळी अडचणी आल्या. त्यामुळे पुन्हा त्यांना त्या विषयाचे अध्यापन करून अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला जाईल.
- अमित भाटीया, पलोड सीबीएसई स्कूल
--------------
दहावी, बारावीचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे़ आता विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षा घेतल्या जातील. १ मार्चपासून प्रॅक्टीकलला सुरूवात होईल. परीक्षावेळी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल.
-विराफ पेसूना, प्राचार्या, रूस्तमी सीबीएसई स्कूल