यंदा शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:14 AM2021-05-30T04:14:33+5:302021-05-30T04:14:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सागर दुबे जळगाव : कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे दहावीची बोर्ड परीक्षा राज्य सरकारने रद्द ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सागर दुबे
जळगाव : कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे दहावीची बोर्ड परीक्षा राज्य सरकारने रद्द केली होती. या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे होणार, त्याची पद्धती राज्य सरकारने शुक्रवारी जाहीर केली. सोबतच दहावीचा निकाल जून अखेर घोषित करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यंदा दहावीतील सर्वच विद्यार्थी पास होणार असल्यामुळे शाळांचा शंभर टक्के निकाल लागेल, अशी प्रतिक्रिया शिक्षणतज्ज्ञ व शिक्षकांनी दिली.
राज्य शासनाने शुक्रवारी दहावीच्या निकालाचे सूत्र जाहीर केले. एकंदरीत नेहमीच शंभर टक्के निकाल लावण्यासाठी सर्व शाळांचे प्रयत्न सुरू असतात. कुठलाही विद्यार्थी नापास होउ नये यासाठी वारंवार सराव परीक्षा शाळांकडून घेतल्या जात असतात. मात्र, यंदा परीक्षा होणार नसल्यामुळे सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण होणार आहेत. त्यामुळे सर्वचं शाळांचा निकाल हा शंभर टक्के लागेल.
=========
दहावी परीक्षेसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी (नाशिक विभाग)
जळगाव : ५८ हजार ३१७
नाशिक : ९३ हजार २२०
धुळे : २८ हजार ९५५
नंदुरबार : २१ हजार १८३
===========
बारावी परीक्षेसाठी विद्यार्थी नोंदणी संख्या
जळगाव : ४९ हजार ४०३
विज्ञान : २० हजार १९४
कला : २० हजार ४९१
वाणिज्य : ६ हजार २९५
एमसीव्हीसी : २ हजार ४२३
==========
- ना बोर्ड हारा... ना स्कूल..
सध्याची स्थिती पाहता शासन निर्णय योग्य वाटतो. शालेय स्तरावरील शिक्षकांचे कामकाज थोडे वाढेल. शाळेत येवून निकाल तयार करण्यात अडचणी येतील. दुसरीकडे परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांनी भरले आहे. ते कसे परत करणार याचा सुध्दा शासनाला विचार करावा लागणार आहे. अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा ही ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पध्दतीने घेण्यात यावी व संपूर्ण प्रक्रिया जुलै आधीपूर्ण करावी, जेणे करून नवीन शैक्षणिक वर्ष सुरळीत सुरू होतील.
- किशोर राजे, शिक्षण तज्ज्ञ
-------------
जो निकाल ९४ किंवा ९५ टक्के लागत होता. तो यंदा १०० टक्के लागणार आहे. ना बोर्ड हारा, ना स्कूल हारा अशी परिस्थिती यंदा पहायला मिळत आहे. नववी आणि आणि दहावीच्या गुणांच्या आधावर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाणार आहे.
- चंद्रकांत भंडारी, शिक्षण तज्ज्ञ
=========
परीक्षा रद्द झाल्यामुळे सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण होणार आहेत. प्रश्न होता, निकाल कसे लावणार. मात्र, तो प्रश्न देखील शुक्रवारी राज्य शासनाने सोडविला. मूल्यमापनाच्या धोरणानुसार निकाल जाहीर केले जातील.
- मानव भालेराव, शिक्षक
------------
दहावीची परीक्षा महत्वाची असते. त्यामुळे अभ्यासाचे नियोजन केले होते. ऑनलाइन शिक्षण मिळाले. पण, प्रत्यक्ष शिक्षण व ऑनलाइन शिक्षणात मोठा फरक असतो. शाळाकडून सुध्दा तीन ते चार वेळा सराव परीक्षा घेवून परीक्षेची तयारी करून घेतली होती. त्यामुळे परीक्षा व्हायला हव्या होत्या.
- हेमंत साळुंखे, विद्यार्थी
==========
- असे आहे निकालाचे सूत्र
विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मूल्यमापन करण्यात येईल. दहावीत अंतर्गत मूल्यमापनासाठी ३० गुण, प्रात्यक्षिकसाठी २० गुण आणि नववीत मिळवलेल्या गुणांसाठी ५० गुणांचे वेटेज अशा पद्धतीने मूल्यमापन करून दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.