पारोळा चोरवड रस्त्यावर एकाचा घातपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 10:19 PM2021-05-26T22:19:52+5:302021-05-26T22:20:48+5:30
पारोळा चोरवड रस्त्यावर वाघरे गावालगत एका अज्ञात व्यक्ती मृत अवस्थेत आढळली असून त्याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळा : पारोळा चोरवड रस्त्यावर वाघरे गावालगत एका अज्ञात व्यक्ती मृत अवस्थेत आढळली असून त्याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. दरम्यान याप्रकरणी येथील कोविड सेंटरचे डाॅक्टर व कर्मचारी यांना चाैकशीसाठी ताब्यात घेतले होते.
पडल्याची माहिती पारोळा पोलिसांना दि २६ रोजी सकाळी मिळाली होती. त्यानुसार तपास सुरू असताना सुळ बाभूळ भरलेला ट्रक (जीजे२६ टी ३६३८)ने रात्री ११ वाजेच्या सुमारास जीवनधारा कोविड सेंटरच्या गेटला धडक दिल्याची माहिती मिळाली होती. या ट्रकच्या धडकेत कोविड सेंटरचे नुकसान झाले होते. ती भरपाई मिळावी, म्हणून ट्रक चालकास कोव्हिड सेंटरच्या टीमने ताब्यात घेऊन ट्रकदेखील तिथेच थांबवून ठेवला होता. यावेळी घातपात झालेला व्यक्ती हा ट्रकचा संबधित आहे. हे कोविड सेंटरच्या पथकास माहिती न झाल्याने त्यांनी रात्री या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली नाही. याबाबत दि २६ रोजी पोलीस निरिक्षक संतोष भंडारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागूल यांनी घटनास्थळी भेट देऊन मयत व्यक्तीचे शव पारोळा कुटीर रुग्णालयात शवविच्छेदनसाठी आणले होते. वैद्यकीय तपासणीत मयताच्या डोक्यावर, पायावर व इतर अनेक भागावर जोरदार प्रहार केलेले दिसून येत होते. रक्तबंबाळ स्थितीत असलेले शव पाहता हा नक्की घातपात असल्याचा संशय पोलिसांनी डोळ्यासमोर ठेवत चौकशी सुरू केली.
वाघरे रस्त्यावर दि. २६ रोजी सकाळी ८.३० वाजता सार्वजनिक जागेवर एका ३५ ते ४० वर्षे वयाचा सिध्या कर्मा भिल (कारागड, काटेपाडा, ता. नवापूर, जि. नंदूरबार) हा रक्तबंबाळ स्थितीत असलेले पडल्याची खबर वाघरे पोलीस पाटील भाऊसाहेब आत्माराम हटकर यांनी पारोळा पोलिसात दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून याबाबत पुढील तपास हवालदार सुनील वानखेडे करत आहेत.
फॉरेन्सिक लॅबच्या पथकास पाचारण
प्रथम जीवनधारा कोविड सेंटरचे डॉक्टर व कर्मचारी यांना ताब्यात घेतले होते. उशिरापर्यन्त त्यांची अतिरिक्त पोलीस अधीक्षक चाळीसगाव सचिन गोरे, उपविभागीय अधिकारी राकेश जाधव पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांच्याकडून चौकशी सुरू होती. यावेळी फॉरेन्सिक लॅबच्या पथकास पाचारण करण्यात आले होते तर सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाईल तपासणीसाठी पोलिसांनी ताब्यात घेऊन रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. ट्रकमध्ये जयेश वसंत मालचे (धनोटा, शहादा) हा मयतासोबत असल्याचे समजते.