एक किमीचा रस्ता तयार झाला फक्त साठ हजारांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:11 AM2021-06-30T04:11:29+5:302021-06-30T04:11:29+5:30
कित्येक निवडणुका, मेळावे, बैठका या रस्त्यांच्या दुरुस्ती-बांधणीवरून होऊन गेल्या. रस्त्याच्या बाबतीत लिहायचे म्हटले तर दूरपर्यंत पसरलेल्या माळावर सगळी कोरडवाहू ...
कित्येक निवडणुका, मेळावे, बैठका या रस्त्यांच्या दुरुस्ती-बांधणीवरून होऊन गेल्या. रस्त्याच्या बाबतीत लिहायचे म्हटले तर दूरपर्यंत पसरलेल्या माळावर सगळी कोरडवाहू अर्थात फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी शेती आहे. शेती करायची म्हणजे पावसाळ्यात जाणे-येणे झालेच...!
खरे तर हा एकूण चार किमी लांबीचा रस्ता आदी ते अंतापर्यंत खडतरच होता. पण दुर्दैवाने जावेच लागते. त्यातील एक किलोमीटरचा रस्ता म्हणजे अवघडच होता. प्रचंड चिखल, पाण्याने भरलेले डबके, दुतर्फा झाडेझुडपांनी वेढलेला, ना पायी जाता येईना.
अनेकदा काढलेली पिके महिनोन महिने शेतात ठेवावी लागे. काही शेतमाल डोक्यावर घेऊन आणावा लागे. हा एवढा रस्ता झाला पाहिजे ही प्रत्येकाची मागणी होती. पण करणार कोण, हा प्रश्न होता आणि हा रस्ता कित्येक वर्षे तरी होणार नाही, यावरदेखील लोकांना ठाम विश्वास होता. आमदार मंगेश चव्हाण व गुणवंत सोनवणे यांच्या शिवनेरी फाउंडेशन संचालित भूजल अभियानाविषयी ऐकले व प्रकल्प समन्वयक राहुल राठोड यांच्या माध्यमातून आमदारांची भेट घेतली.
सेवा सहयोग फाउंडेशनकडून जेसीबी मशीन उपलब्ध झाले व शेतकऱ्यांकडून डिझेल खर्चासाठी वर्गणी जमा करण्यात आली आणि कामाचा श्रीगणेशा झाला. साधारणत: अवघड व जीवघेणा असणारा १ किमी लांबीचा रस्ता केवळ ६० हजार रुपयांत बनवून तयार झाला. यात शासनाचे अंदाजे ६ ते ७ लाख रुपये वाचले हे विशेष आणि यासाठी शेतकरी गेल्या ४० वर्षांपासून वाट पाहत होते. शिवनेरी फाउंडेशनअंतर्गत भूजल अभियानाचा शिवार रस्ता बनविण्यासाठी उपयोग झाला. शेतकऱ्यांनी आपली समस्या स्वतः सोडविल्याने एक सकारात्मकता निर्माण होण्यास मदत झाली. या कामाच्या यशस्वितेसाठी जि. प. सदस्य भूषण पाटील व अमोल चव्हाण यांनीदेखील देणगी देऊन सहकार्य केले.
स्थानिक पातळीवर पाणी समितीप्रमुख सुनील राठोड, उपसरपंच समाधान चव्हाण, ग्रामरोजगार सेवक साईनाथ चव्हाण, ग्रा.पं. सदस्य पापालाल राठोड, शेतकरी दत्तू जाधव, दावल चव्हाण, श्रीपत चव्हाण यांनी परिश्रम घेतले.