गुजरातमधून येणारा एक लाखाचा गुटखा जप्त
By admin | Published: April 17, 2017 11:52 PM2017-04-17T23:52:17+5:302017-04-17T23:52:17+5:30
साक्री पोलिसांची कारवाई : पारोळा येथील एकास अटक
साक्री : अहमदाबाद-धुळे बसमधून गुजरात राज्यातील सोनगड येथे नेण्यात येणारा 1 लाख रुपये किमतीचा गुटखा साक्री पोलिसांनी जप्त केला आहे. गुटखा विक्रीसाठी आणणा:या रमेश रुपचंद पाटील (60, रा. पारोळा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
साक्री पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अहमदाबाद-धुळे बसमध्ये गुजरात राज्यातील सोनगड येथून चोरीच्या मार्गाने साक्री येथे गुटखा येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आज सायंकाळी सदर बसला (एमएच-20 बीएल 4181) साक्री पोलीस स्टेशनजवळ थांबविण्यात आली. या बसची तपासणी केली असता, बसचालकाच्या केबिनमध्ये व बसमधील इतर बाकांमध्ये पाच गोण्यांमध्ये दडपलेला गुटखा आढळून आला.
गावठी दारूजप्त
आज दिवसभरातून शेवाळी येथे ही पोलिसांनी छापा टाकून 30 हजार रुपयांची गावठी दारू जप्त केली आहे; शेवाळी येथील एका नाक्याजवळ गावठी दारूची भट्टी उद्ध्वस्त केली असून दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन व दारूसह 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी सतीश रामचंद्र मालचे याला ताब्यात घेतले आहे. सुरपान येथेही साक्री येथील पोलिसांनी सट्टय़ाचे आकडे घेणा:याला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक धनराज पाटील, अतुल तांबे, तारासिंग पावरा, गुलाब वसावे व लक्ष्मीकांत वाघ यांनी केली आहे.