तलवारीचा धाक दाखवून उद्योजकाची एक लाखाची रोकड लुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:11 AM2021-05-03T04:11:12+5:302021-05-03T04:11:12+5:30
कुसुंबा : न्यायालयीन वादातून घडली घटना जळगाव : गेल्या वर्षीच्या न्यायालयीन वादातून साहेबराव जगन पाटील (वय ४५) यांना चौघांनी ...
कुसुंबा : न्यायालयीन वादातून घडली घटना
जळगाव : गेल्या वर्षीच्या न्यायालयीन वादातून साहेबराव जगन पाटील (वय ४५) यांना चौघांनी तलवार दाखवून जिवेठार मारण्याची धमकी देत खिश्यातील १ लाख रुपयांची रोकड लांबविल्याची घटना तालुक्यातील कुसुंबा येथे शनिवारी रात्री उघडकीला आली आहे. याप्रकरणी रवींद्र उर्फ भुरा शांताराम कोळी, प्रवीण शांताराम कोळी, विलास शांताराम कोळी आणि शांताराम सुपडू कोळी (सर्व रा. कुसुंबा) यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साहेबराव जगन पाटील यांची एमआयडीसीत पीव्हीसी पाइपची कंपनी आहे. शनिवारी १ मे रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास पाटील मित्राकडे हळदीच्या कार्यक्रमाला जात असताना गावातील रवींद्र उर्फ भुरा शांताराम कोळी, प्रवीण शांताराम कोळी, विलास शांताराम कोळी आणि शांतराम सुपडू कोळी यांनी गेल्यावर्षी दाखल केलेल्या केसचा वचपा काढण्यासाठी साहेबराव पाटील यांना गावातील मराठी शाळेच्या आवारात अडविले. रवींद्र कोळी याने हातात तलवार घेऊन जिवे ठार मारण्याची धमकी देत प्रवीण कोळी याने त्यांच्या खिश्यातील एक लाख रुपयांची रोकड जबरी काढून घेतली व चौघे जण घटनास्थळाहून पसार झाले. याआधीदेखील त्यांनी चाकूचा धाक दाखवून दहशत निर्माण केली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी साहेबराव पाटील यांच्या फिर्यादीवरून चौघांवर एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे करीत आहे.