भुसावळ हत्याकांडात आणखी एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 09:57 PM2019-10-11T21:57:24+5:302019-10-11T21:58:01+5:30
गुन्हा घडण्याआधी व नंतर होता मारेकऱ्यांच्या संपर्कात
जळगाव : भुसावळ येथील नगरसेवक रवींद्र उर्फ हम्प्या बाबुराव खरात याच्यासह पाच जणांच्या हत्याकांडात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आकाश सुखदेव सोनवणे (१९, रा.भुसावळ) याला अटक केली आहे. आकाश याला दोन दिवसापूर्वीच अहमदाबाद येथून ताब्यात घेण्यात आले होते. या हत्याकांडात आरोपीची संख्या वाढणार असल्याची शक्यता ‘लोकमत’ने वर्तविली होती, ती खरी ठरली आहे. दरम्यान, आकाश याच्या अटकेला अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी दुजोरा दिला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या आधी व नंतर आकाश हा आरोपींच्या संपर्कात होता. गोळीबार झाल्यानंतर आकाश याने तेथून थेट अहमदाबादला पळ काढला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या असून शुक्रवारी त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या हत्याकांडाला कलाटणी मिळण्याची शक्यता असून आणखी आरोपी वाढू शकतात, असेही बोलले जात आहे. सागर हा घराकडून चर्चकडे जात असल्याची टीप आकाश यानेच मारेऱ्यांना दिली होती, असेही तपासात पुढे आले आहे.
मृत सागरवर एमपीडीएची कारवाई होती प्रस्तावित
या घटनेत मृत झालेला सागर याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यानुसार त्याच्यावर हद्दपारीची कारवाई प्रस्तावित होती. त्याला याबाबत पोलीस ठाण्यात बोलावून नोटीसही देवून १० आॅक्टोबर रोजी हजर राहण्याचे सांगण्यात आले होते. मात्र त्यापूर्वीच त्याचा खून झाला, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी दिली.