जनतेचे लक्ष वळविण्यासाठी 'वन नेशन वन इलेक्शन' - शरद पवार
By विलास बारी | Published: September 5, 2023 02:03 PM2023-09-05T14:03:39+5:302023-09-05T14:03:52+5:30
जळगाव शहरातील अजिंठा विश्रामगृहावर त्यांची पत्रकार परिषद झाली.
जळगाव : केंद्र सरकारच्या विरोधात जनमानसात तीव्र नाराजी आहे.तो नाराजीचा मुद्दा दूर करण्यासाठी व जनतेचे लक्ष दुसऱ्या दिशेने वळविण्यासाठी भाजपने वन नेशन वन इलेक्शनचा मुद्दा पुढे केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रमुख व खासदार शरद पवार यांनी मंगळवारी जळगावात पत्रकार परिषदेत केले.
जळगाव शहरातील अजिंठा विश्रामगृहावर त्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी राज्य सरकारने अन्य कार्यक्रमांना महत्व न देता शेतकऱ्यांच्या प्रश्नांना महत्व द्यायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली.शेतकऱ्यांना पुरेसा वीज पुरवठा आजही उपलब्ध होत नाही आहे.संभाव्य दुष्काळीस्थिती लक्षात घेता शासनाने जी पिके चांगल्या स्थितीत आहेत त्यांना वाचविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करायला हव्या. यासोबत शेतकत-यांकडून वसुली केली जात आहे ती थांबविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
दुष्काळी परिस्थिती पाहता उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची स्थिती आहे. त्यासाठी उपाययोजना शासनाने कराव्या. तसेच चारा टंचाई निर्माण होण्याआधी त्याबाबत उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगतले. जळगावसह पूर्ण खान्देशात दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे राज्य शासनाने दुष्काळाबाबत तातडीने पावले उचलने गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.