बनावट ओळखपत्रावर बसमध्ये प्रवास करणाऱ्या एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 10:25 PM2018-04-22T22:25:55+5:302018-04-22T22:25:55+5:30
अपंगांचे बोगस ओळखपत्र देणारी औरंगाबादेत टोळी
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.२२ : औरंगाबाद जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी यांची बनावट सही व शिक्का असलेल्या अपंगाच्या बनावट ओळखपत्रावर प्रवास करणाºया अविनाश पुंडलिक कदम (वय ४१, रा.सूर्यवाडी, हर्सुल, ता.जि.औरंगाबाद) या प्रवाशाला जळगाव आगाराच्या वाहकाने रविवारी रंगेहाथ पकडले. कदम यांना अटक करण्यात आली असून जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव आगाराचे वाहक गोपाळ भिका पाटील यांची रविवारी शिरपुर-जळगाव या बसवर ड्युटी होती. चालक म्हणून प्रभाकर जगन्नाथ सोनवणे (रा.आसोदा, ता.जळगाव) होते. रविवारी ही बस (क्र.एम.एच.१४ बी.टी.३९११) धरणगावमार्गे जळगावला येत असताना सावखेडा येथून अविनाथ कदम हे या बसमध्ये बसले. ५० टक्के अपंगाचे ओळखपत्र दाखवून त्यांनी जळगावचे तिकीट घेतले.
संशय आल्याने व्हॉटसअपवरुन ओळखपत्राचे पाठवले फोटो
वाहक पाटील यांनी या ओळखपत्राची बारकाईने पाहणी केली असता संशय आल्याने त्यांनी या ओळखपत्राचे फोटो काढून स्थानक प्रमुख निलिमा बागुल यांच्या व्हॉटसअॅपवर पाठविले. बागुल यांनी ओळखपत्राची पडताळणी केली असता ते बनावट असल्याचे निष्पन्न झाले.
त्यामुळे एस.टी.बस थेट जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला नेण्यात आली. तेथे वाहक गोपाळ पाटील यांनी फिर्याद दिल्याने कदम यांच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन त्यांना लागलीच अटक करण्यात आली.