पहूरनजीक अपघातात एक जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:12 AM2021-06-23T04:12:35+5:302021-06-23T04:12:35+5:30
पहूर, ता. जामनेर : चिलगाव सांगवी रस्त्यावर टँक्टर व दुचाकीचा अपघात होऊन चिलगाव येथील सख्ख्या दोन भावडांपैकी ...
पहूर, ता. जामनेर : चिलगाव सांगवी रस्त्यावर टँक्टर व दुचाकीचा अपघात होऊन चिलगाव येथील सख्ख्या दोन भावडांपैकी एक निवृत्ती उखर्डू सुतार (५२) हे जागीच ठार झाले तर रोडलगत बकऱ्या चारणाऱ्या महिलेसह दुसरा भाऊ जखमी झाले. यात एक बकरीदेखील ठार झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी चिलगाव रस्त्यावर किशोर पाटील यांच्या शेताजवळ वळण रस्त्यावर एम. एच. १९-३१५३ क्रमांकाचे ट्रॅक्टर माती घेऊन पहूरकडे येत होते. तर एम. एच. १९ बी.के. क्रमांकाच्या दुचाकीने निवृत्ती उखर्डू सुतार व वामन उखर्डू सुतार (६०) हे दोघे दुचाकीने चिलगावकडे जात होते. माती वाहतूक करणाऱ्या टँकर रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊन समोरून येणाऱ्या दुचाकीवर धडकले. यात निवृत्ती उखर्डू सुतार हे जागीच ठार झाले. तर वामन सुतार गंभीर जखमी असून यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कुमावत व वैद्यकीय अधिकारी डॉ. आरीफ शेख मोहम्मद यांनी प्राथमिक उपचार केले व पुढील उपचारासाठी जखमी वामन यांना जळगाव येथे हलविले.
घटनास्थळी तणाव घटनास्थळी सांगवीतील जमुराबाई बाबू तडवी बकऱ्या चारत होती. या अपघातात त्या जखमी झाल्या असून आश्रफ इम्रान तडवी यांची बकरी ठार तर तीन बकऱ्या गंभीर जखमी आहेत. घटनास्थळी जमावाकडून शांतता भंग झाल्याने तातडीने साहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल नाईक, श्रीराम धुमाळ, प्रदीप चौधरी, अनिल राठोड, दाखल झाले व जमावाला पांगवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. गोपाल वामन सुतार यांच्या तक्रारीवरून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुतार यांचा परिवार उघड्यावर
निवृत्ती सुतार हे रिक्षा चालवून परिवाराचा निर्वाह करीत होते. ते अल्पभूधारक शेतकरी असून परिस्थिती हालाखीची आहे. त्यांच्या जाण्याने परिवारावर मोठे संकट आले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले व पत्नी असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच चिलगाव येथील नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात एकच गर्दी केली व हळहळ व्यक्त करीत होते.
कॅप्शन - सांगवी-चिलगाव रस्त्यावर झालेल्या अपघातात ट्रॅक्टर व दुचाकी दिसत आहे.