वेले जवळ झालेल्या अपघातात एकजण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 10:42 PM2021-04-24T22:42:29+5:302021-04-24T22:43:08+5:30
वेले ते मजरेहोळ फाटा यांच्या दरम्यान रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दुचाकीचा अपघात झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चोपडा : चोपडा अमळनेर रस्त्यावर वेले ते मजरेहोळ फाटा यांच्या दरम्यान रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दुचाकीचा अपघात झाला. दुचाकी चालक सुभान्या बारेला (३२) जागीच ठार झाले असून त्याची पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाले आहे. गंभीर जखमी झालेल्यांना अधिक उपचारासाठी जळगाव येथे हलविले आहे.
रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास दुचाकी वाहनावर (एम पी ६९०५) यावर मक्याच्या गोणीसह सुभान्या बारेला (३२) त्याची पत्नी निर्मला सुभान्या बारेला (२६) आणि मुलगी भारती सुभान्या बारेला (१४) हे चोपडाकडून अमळनेरकडे जात असताना वेले ते मजरेहोळ फाटा या दरम्यान अज्ञात पिकअप या वाहन चालकाने जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की त्या धडकेत दुचाकी वाहनाचा चुराडा झालेला आहे. धडक देऊन पिकअप वाहन चालक वाहनासह पसार झाला आहे. घटनेची माहिती वेले येथील उपसरपंच दीपक पाटील यांना भ्रमणध्वनीवरून वेले गावातून कळविण्यात आले. ते तापी सहकारी सूतगिरणी मध्ये कर्तव्यावर असताना त्यांनी चेअरमन तथा माजी आमदार कैलास पाटील यांच्या परवानगीने हे अपघात स्थळ गाठले आणि मयतासह सह दोघे बेशुद्धावस्थेत असलेल्या पत्नी व मुलगी यांना खासगी वाहनातून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
आडगाव येथील दोन मुलांनी त्यांच्या खाजगी वाहनात मयातास व जखमींना उपजिल्हा रुग्णालयात पोहोचविले. यावेळेस आखतवाडे गावातील प्रवीण पाटील, वेले येथील उपसरपंच दीपक पाटील, कमलेश पाटील, रुपेश पाटील यांनी चोपडा शहरातील सामाजिक कार्यकर्ता व रुग्णवाहिका मालक सागर बडगुजर यांना भ्रमणध्वनीवरून ही घटना कळवली. सागर बडगुजर यांनीही पंधरा ते वीस मिनिटात घटनास्थळ गाठले आणि जखमींना रुग्णवाहिकेत टाकून उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. घटनेचे वृत्त उपजिल्हा रुग्णालयातून चोपडा शहर पोलिसांना कळविण्यात आले असून चोपडा शहर पोलिसांतर्फे गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.