धरणगावात हॉटेलमध्ये नाश्त्यानंतर एकाची प्रकृती बिघडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 02:33 PM2021-03-12T14:33:46+5:302021-03-12T14:34:17+5:30
हॉटेलमध्ये नाश्ता केल्यानंतर पाळधी येथील एका तरुणाची प्रकृती अचानक बिघडली. याप्रकरणी या हाॅटेलला नोटीस देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
धरणगाव : शहरातील शिवाजी महाराज चौकातील राजस्थानी नमकीन हॉटेलमध्ये नाश्ता केल्यानंतर पाळधी येथील एका तरुणाची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे नागरिकांनी त्या तरुणाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
पाळधी येथील विकी रामदास गुजर (२४) हा तरुण कामानिमित्त धरणगाव येथे आला होता. दुपारी साधारण साडेबारा वाजेच्या सुमारास नाश्ता करण्यासाठी तो शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास समोरील राजस्थानी नमकीन या हॉटेलमध्ये गेला. याठिकाणी त्याने कचोरी, जिलेबी यासह इतर पदार्थ सेवन केले. नाश्ता केल्यानंतर बिल वगैरे दिले. गेल्यावर हॉटेलच्या बाहेर निघायला लागताच त्या तरुणाला मळमळ आणि उलट्यांचा त्रास व्हायला लागला. त्यामुळे जवळपासच्या नागरिकांनी त्याला सिव्हिल हॉस्पिटलला दाखल होण्याचे सांगितले. त्यानुसार विकी लागली दवाखान्यात अॅडमिट झाला. याठिकाणी डॉ. गिरीश बोरसे यांनी विकीवर प्रथम उपचार केले. याची माहिती पालिका प्रशासनाला मिळताच पालिका प्रशासनाने हॉटेल राजस्थान नमकीनला स्वच्छता आणि उघड्यावर अन्नपदार्थ बनविण्यासंदर्भात नोटीस जारी केली.
तसेच वैद्यकीय अहवालात अन्न विषबाधा असा विषय समोर आल्यास अन्न आणि आैषध प्रशासन विभागाला संबंधित हॉटेल चालकावर कारवाईसाठी अहवाल पाठविणार असल्याचेदेखील पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान,उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर धरणगाव शहरातील उघड्यावर अन्नपदार्थ बनविणाऱ्या हॉटेल मालकांना पालिका प्रशासनाने योग्य ती सक्त ताकीद द्यावी, अशी मागणी या निमित्ताने होत आहे.