Ganesh Chaturthi 2018 : एक हजारावर दुचाकी व ४०० चारचाकी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:53 PM2018-09-14T12:53:52+5:302018-09-14T12:59:34+5:30
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचीही मोठ्या प्रमाणात खरेदी
जळगाव : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारात गुरुवारी मोठी गर्दी झाली होती. दुचाकी व कारला मोठी मागणी राहिली तसेच एलईडीचीही चांगली विक्री झाली. ३००च्यावर मोबाईल विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. गुरुवारी संध्याकाळपर्यंत नवीन एक हजार दुचाकी तर ४०० चारचाकी रस्त्यावर आल्या.
साडेतीन मुहुर्तांसह गणेश चतुर्थीलादेखील विविध वस्तूंची खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीसाठी या वस्तूंची अगोदरच नोंदणी (बुकिंग) करून ठेवतात. त्यानुसार यंदाही अनेकांनी नोंदणी (बुकिंग) करून ठेवली होती. बुधवारी व गुरुवारी अनेकांनी विविध वस्तूंची खरेदी करून गणेश चतुर्थीचा मुहूर्त साधला.
एक हजार दुचाकींची विक्री
गणेश चतुर्थीच्या दिवशी दुचाकी खरेदीला ग्राहकांची मोठी पसंती दिसून आली. शहरातील एकाच दालनात ३००च्यावर दुचाकींची विक्री झाली. या दुचाकींसह इतरही दालनातील मिळून एकूण एक हजार दुचाकी विक्री झाल्याचा अंदाज विक्रेत्यांनी वर्तविला आहे. दुचाकींवर विविध योजना असल्याने त्याचाही लाभ ग्राहकांनी घेतला. यामध्ये मनपसंत वाहन मुहूर्तावर मिळण्यासाठी अनेकांनी आगाऊ नोंदणी करून ठेवली होती. या नोंदणी केलेल्या वाहनांसह ऐन वेळीदेखीलखरेदी मोठ्या प्रमाणात झाली. यासाठी गुरुवारी दालनांमध्ये मोठी गर्दी झाली होती.
चारचाकी वाहने
दुचाकी पाठोपाठ चारचाकी वाहनांच्या खरेदीतही उत्साह आहे. शहरातील एकाच दालनात १५० चारचाकींची बुकिंग झाले आहे. गुरुवारी येथून केवळ ५० वाहने ग्राहकांना दिली जाणार होती. मागणी वाढल्याने ही संख्या ८०वर पोहचली. एकूणच शहरातील विविध दालनांमधून ४०० चारचाकी वाहनांची विक्री होण्याचा अंदाज आहे. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी बुधवारीदेखील २० ते ३० चारचाकी वाहनांची विक्री झाली होती. त्यामुळे या दोन्ही दिवस दालनामध्ये मोठी गर्दी झाली होती.
मोबाईल बाजार जोरात
यंदा मोबाईलला मोठी मागणी राहिली. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नेहमीपेक्षा मागणी दुप्पट वाढल्याचे काही विक्रेत्यांनी सांगितले. संध्याकाळपर्यंत तब्बल ३०० मोबाईलची विक्री झाली होती. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये एलईडीला जास्त मागणी होती. शहरात जवळपास १०० एलईडी विक्री झाल्याचे सांगण्यात आले. त्या खालोखाल होम थिअटर, वाशिंग मशिन, फ्रिज यांना मागणी राहिली.
यंदा चारचाकी वाहनांना मोठी मागणी वाढली आहे. गणेश चतुर्थीसाठी अनेकांनी अगोदरच नोंदणी केलेली होती. आज ८० वाहनांची विक्री झाली.
- उज्ज्वला खर्चे, व्यवस्थापक.
दुचाकींना नेहमीप्रमाणे चांगली मागणी राहिली. गणेश चतुर्थीसाठी मोठी नोंदणी होती. रात्रीपर्यंत खरेदीसाठी गर्दी होती.
- अमित तिवारी, महाव्यवस्थापक.
इलेक्ट्रॉनिक्स बाजारात एलईडी, होम थिएटरला मागणी राहिली. त्या खालोखाल वाशिंग मशिन, फ्रिज यांना चांगली मागणी होती. विविध योजना दिल्या जात असल्याने त्याचा फायदा ग्राहकांना होतो.
-दिनेश पाटील, विक्रेते